महाआॅनलाईन केंद्रातून रक्कम काढा!
By admin | Published: March 20, 2017 01:29 AM2017-03-20T01:29:38+5:302017-03-20T01:29:38+5:30
येथील एसबीआय बँकेने १० हजारापेक्षा कमी रक्कम काढायची असेल तर बँकेत येऊ नका, तेवढी रक्कम
एटापल्ली एसबीआयचे निर्देश : १० हजारांपेक्षा कमी रोकड देण्यास नकार
एटापल्ली : येथील एसबीआय बँकेने १० हजारापेक्षा कमी रक्कम काढायची असेल तर बँकेत येऊ नका, तेवढी रक्कम महाआॅनलाईन केंद्रामधून (सीएससी) काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा चांगलाच फटका ग्राहकांना बसत आहे. बँक कर्मचारी व महाआॅनलाईन केंद्राचे कर्मचारी यांच्यामध्ये साठगाठ असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.
एसबीआय ही एटापल्ली तालुक्यातील पहिली व एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे इतर बँकांच्या तुलनेत या बँकेत सर्वाधिक खातेदार आहेत. ३० ते ४० किमी अंतरावरून नागरिक बँकेमध्ये येतात. त्यामुळे या बँकेत नेहमीच गर्दी राहते. मागील एक महिन्यांपासून या बँकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्यावरील कामाचा भार कमी पडावा म्हणून १० हजारापेक्षा कमी रूपयांची रक्कम महाआॅनलाईन केंद्रातून काढा, असे सांगून ग्राहकांना परत पाठवित आहेत. या संदर्भात फलकावर तसेच कुठेही इतरत्र सूचना लिहिल्या नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही अशा प्रकारच्या सूचना बँकेला नाहीत. याबाबत बँक व्यवस्थापक संजय गोघाटे यांना विचारणा केली असता, ज्या ग्राहकांनी महाआॅनलाईन केंद्रातून खाते उघडले आहे. त्यांनाच फक्त त्याच केंद्रातून व्यवहार करण्यास सांगितले जात आहे, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बँकेची तक्रार पेटी पडली आहे कचऱ्यात
बँकेबाबतच्या काही तक्रारी असल्यास त्या स्वीकारण्यासाठी प्रत्येक बँकेत तक्रार पेटी लावली जाते. या बँकेतील तक्रारपेटी मात्र एका कोपऱ्यात अडगळीत ठेवण्यात आली आहे. नागरिक या पेटीच्या सभोवताल खर्रा खाऊन थुकतात. यावरून नागरिकांच्या तक्रारीबाबत बँक फारशी गंभीर नसल्याचे दिसून येत आहेत. एटापल्ली येथील एसबीआय व सहकारी बँकेचे दोन एटीएम आहेत. सदर एटीएम मागील एक महिन्यापासून बंद आहेत. बँकेचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. या बँकेत कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत.