रूग्णवाहिका तिपटीने महागली
By admin | Published: May 19, 2016 01:14 AM2016-05-19T01:14:32+5:302016-05-19T01:14:32+5:30
शासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे.
तीन पट वाहतूक दर वाढले : खासगी वाहनांचा घ्यावा लागत आहे आधार
प्रतीक मुधोळकर अहेरी
शासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष सुट देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील रूग्णांना तालुकास्थळावरील ग्रामीण रूग्णालयात भरती करणे व ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांना गडचिरोली, चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलविण्यात रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडते. रूग्णवाहिकेचे आजपर्यंतचे दर सर्वसामान्य व गरीब नागरिकांच्या आवाक्यामधील होते. प्रती किलोमीटर पाच रूपये एवढा दर आकारला जात होता. मात्र २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार आरोग्य सुविधांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. यामध्ये रूग्णवाहिकेचा दर्जा प्रती किमी पाच रूपयांवरून १५ रूपये एवढा केला आहे. त्यामुळे रूग्णांना अधिकचे पैसे मापावे लागत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक रूग्णाला रूग्णवाहिकेतून नेण्याचे टाळत असल्याचे चित्र दिसून येते. सद्यस्थितीत फक्त गरोदर मातांनाच मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे काही रूग्णालयातील डॉक्टर या गरोदर मातेसोबतच रूग्णाला पाठवित आहेत. मात्र गरोदर माता न मिळाल्यास पैसे मोजण्याशिवाय पर्याय राहत नाही. रूग्णाला रूग्णालयामध्ये पोहोचविल्याबरोबर रूग्णवाहिकेचे बिल नगदी स्वरूपात देणे आवश्यक आहे. अन्यथा विलंब शुल्क आकारण्यात येते. या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तासाला ७५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. या वाढीव शुल्कामुळे रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी शुल्कामध्ये कपात करण्यात यावी, अशी मागणी आहे.
रेपर टू गडचिरोली रूग्णांची संख्या अधिक
मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्थळावर ग्रामीण रूग्णालय तसेच आरमोरी, कुरखेडा व अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय असले तरी या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाच चालविली जात आहेत. ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात निम्म्यापेक्षा अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अत्याधुनिक साधनेही उपलब्ध नाही. त्यामुळे या रूग्णालयामध्ये भरती होणाऱ्या बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. अर्ध्यापेक्षा अधिक रूग्ण रेफर केले जातात. या रूग्णांना रूग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रूग्णवाहिकेचे वाढलेले दर नातेवाईकांसाठी अडचणीचे झाले आहेत.