अमृत आहार योजनेची रक्कम हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:52 AM2017-12-17T00:52:02+5:302017-12-17T00:53:12+5:30
सरपंच व अंगणवाडी कार्यकर्तींच्या नावे बँकेत असलेल्या संयुक्त खात्यातून परस्पर रक्कम लंपास केल्याची लेखी तक्रार चिंतलपल्लीच्या अंगणवाडी कार्यकर्ती अन्नपूर्णा मांडवे यांनी संबंधित बँक शाखेला दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सरपंच व अंगणवाडी कार्यकर्तींच्या नावे बँकेत असलेल्या संयुक्त खात्यातून परस्पर रक्कम लंपास केल्याची लेखी तक्रार चिंतलपल्लीच्या अंगणवाडी कार्यकर्ती अन्नपूर्णा मांडवे यांनी संबंधित बँक शाखेला दिली आहे. सदर तक्रारीची प्रत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व सिरोंचा पोलीस ठाण्यातही देऊन उचित कारवाईची मागणी केली आहे.
कथीत गैरव्यवहार अंगणवाडी मदतनिस हेमलता तोटा हिने केल्याचा उल्लेख तक्रार निवेदनात नमूद आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिरोंचा शाखेत डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम या अमृत आहार योजना या शीर्षकांतर्गत २००८१००६७००४६३४ या क्रमांकाचे बचत खाते आहे. सदर संयुक्त खाते सरपंच अध्यक्ष सरीता तालपेल्ली व सचिव अंगणवाडी कार्यकर्ती अन्नपूर्णा मांडवे यांच्या नावाने आहे. शासनाकडून रक्कम जमा झाल्यावर सदर योजनेच्या विनियोगासाठी रक्कम काढताना अध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. मात्र १७ नोव्हेंबर २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीतील विड्राल फार्मवर मी कधीच सही केली नाही. माझ्या सहीचा दुरूपयोग करून मदतनिस हेमलता हिने हा गैरव्यवहार केला. बँकेतून रक्कम काढण्यासाठी सादर कराव्याच्या विड्रालमागे रक्कम प्राप्तीच्या स्वीकृतीदाखल कथीत मदतनिसची सही आहे. सदर प्रकरणी स्थानिक वरिष्ठ कर्मचारी यांचा देखील सहभाग लक्षात येतो. या प्रकरणी सखोल चौकशी करून न्याय द्यावा, असेही कार्यकर्ती अन्नपूर्णा यांनी म्हटले आहे. दरम्यान मदतनिस महिलेचा पोलिसांनी समक्ष अभियान घेतला. मात्र पुढील कारवाई शुन्य आहे.
या प्रकरणात बँकेच्या वरिष्ठ यंत्रणेकडूनही हालचाली नाही.
अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या ताब्यात होते बँक पासबूक
नोव्हेंबर २०१६ ते २०१७ पर्यंत नगरम बिटाच्या पर्यवेक्षिकेने सदर योजनेचे पासबूक स्वत:कडे ठेवले होते. अंगणवाडी कार्यकर्ती वरिष्ठ कार्यालयास तक्रार करणार असल्याची कुणकुण लागताच पासबूक परत केली. आहार वाटपासाठी किती रक्कम काढू, अशी विचारणा केल्यावर १४ हजार रूपये काढण्यास पर्यवेक्षीकेने सांगितले. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी उक्त रक्कम काढण्यात आली. पासबूकमधील पूर्वीच्या नोंदी पाहिल्यावर गैरप्रकार लक्षात आला. १७ नोव्हेंबर २०१६ ते ३० जून २०१७ या काळात ५० हजार रूपये विड्राल झाले. सदर गैरव्यवहाराशी माझा संबंध नाही, असा कार्यकर्तीचे म्हणणे आहे.
४पासबूक स्वत:च्या ताब्यात ठेवून पर्यवेक्षिका ही कार्यकर्तीला राजीनामा देऊन पद मोकळे करण्याचा दबाव टाकायची. त्यासाठी तिने एक लाख रूपयांची आॅफरही दिली. रिक्त झालेल्या पदावर मतदनिसला पदोन्नती देण्याचा यामागे डाव होता. दरम्यान आहार वाटप रजिस्टर, अंतिम शिल्लक रजिस्टर, इतर नोंदवह्यांसह व्हिझीट बुकेही गहाळ करण्यात आली. गावकºयांकडून खोट्या तक्रार घेऊन अंगणवाडी कार्यकर्तीला कार्यमुक्त करण्याचे षड्यंत्र य मागे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे. चौकशीनंतर सत्य उजेडात येण्याची दाट शक्यता आहे.