बापरे! फिजिओथेरपी विभागाच्या नावावर तब्बल अडीच काेटींची उधळपट्टी
By दिलीप दहेलकर | Published: September 5, 2023 02:47 PM2023-09-05T14:47:11+5:302023-09-05T14:47:27+5:30
सामान्य रुग्णालयातील प्रकार : अनावश्यक साहित्य खरेदीतून आर्थिक गैरव्यवहार
दिलीप दहेलकर
गडचिराेली : मानसिक वा शारीरिक शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलांवर व्यायाम व उपचार करण्यासाठी तसेच अस्थिरुग्ण अर्थात पाठदुखी, मणक्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लाेकांवर उपचार करण्यासाठी जिल्हा वार्षिक याेजनेतून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल अडीच काेटींपेक्षा अधिक निधी खर्च करून फिजिओथेरपी विभागाची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे फिजिओथेरपीसाठी आवश्यकता नसताना येथे व्यायामाचे माेठमाेठी साहित्याची खरेदी करून ते लावण्यात आले आहेत. दरम्यान, येथील महागडे साहित्य, विभागात लावण्यात आलेले झुंबर दिवे, रंगरंगाेटी व इतर तामझाम पाहून अडीच काेटींची उधळपट्टी झाल्याचे दिसून येत आहे.
मानसिक वा शारीरिक शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलांसाठी फिजिओथेरपीचे अत्यंत महत्त्व आहे. मुलांमध्ये अपंगत्वाची तीव्रता कमी करणे आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा वाढवून त्यांना स्वावलंबी बनविणे व त्यांच्या पालकांस साहाय्य करणे हे उद्दिष्ट फिजिओथेरपीचे आहे. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यकता नसताना फिजिओथेरपी विभागाचे नूतनीकरण करण्यात आले. सध्या येथे एक फिजिओथेरपी डाॅक्टर रुग्णांवर औषधाेपचार करताना दिसून येतात. मात्र लहानशा दाेन खाेलीत फिजिओथेरपी विभागाला सीमित करण्यात आले आहे. विशेष यापूर्वी सदर विभागाचे कामकाज व रुग्णसेवा माेठ्या खाेलीतून चालत हाेती, मात्र नूतनीकरणाच्या नावावर या विभागाचे स्वरूपच बदलवून टाकल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी यातून काय साध्य केले, हे न उलगडणारे काेडे आहे.
दीड काेटींची साहित्य खरेदी
जिल्हा वार्षिक याेजनेतून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी पेड्र्याट्रिक फिजिओथेरपी ऑन टर्नकी बेसीस स्थापित करण्याच्या सबबीखाली दीड काेटींच्या निधी खर्चास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळवून घेण्यात आली. सदर दीड काेटीतून केवळ व्यायामाचे साहित्य खरेदी केल्याची माहिती हाती आली आहे. सदर निधीतून फिजिओथेरपीच्या माेठ्या रुग्णांसाठी काहीही करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
सहा वातानुकूलित यंत्रासह लावले जिमचे साहित्य
फिजिओथेरपी विभाग असलेल्या बाजूच्या खाेलीत माेठमाेठ्या व महागड्या अनेक मशीन लावण्यात आल्या आहेत. शिवाय येथे तब्बल सहा वातानुकूलित यंत्र अर्थात एसी बसविण्यात आले आहे. एखाद्या बंगल्याप्रमाणे या जिमच्या खाेलीची सजावट करण्यात आली आहे. रंगीत प्रकाश देणारी अनेक झुंबर दिवे येथे बसविण्यात आले आहेत. टाइल्स, पिओपी व अन्य सजावट येथे करण्यात आली आहे. यावरील संपूर्ण खर्च अडीच काेटींपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
व्यायामाची खाेली कुलूपबंदच
रुग्णालयाच्या बाहेरील प्रवेशद्वाराच्या बाजूला फिजिओथेरपी विभाग निर्माण करण्यात आला आहे. येथे फिजिओथेरपी उपचाराची खाेली सुरू असते. मात्र व्यायामाची खाेली कुलूपबंदच असते. विशेष म्हणजे या जिमसारख्या नव्या फिजिओथेरपी विभागाचे उद्घाटन करण्यात आले नाही.