आणि सर्व शिक्षकांनी एकाच दिवशी मारली शाळेला दांडी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 06:26 PM2021-09-30T18:26:39+5:302021-09-30T18:34:36+5:30
कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील जि.प. शाळेतील सर्व शिक्षक एकाच दिवशी शाळेत गैरहजर राहिले त्यामुळे संपूर्ण शाळा बंद ठेवावी लागली. शिक्षकांच्या या व्यवहाराबद्दल पालकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी एकही शिक्षक कर्तव्यावर हजर न झाल्याने संपूर्ण शाळा बंद ठेवावी लागली. शिक्षकांच्या या भाेंगळ कर्तव्यावर पालकांनी संताप व्यक्त करून शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समितीकडे केली आहे.
घाटी जि. प. उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत वर्ग आहेत. चार वर्गांसाठी ३ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र या शाळेवर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्याने शिक्षक नियमित हजर राहत नाही. गुरुवारी तर येथील तिन्ही शिक्षक एकाच वेळी गैरहजर राहिल्याने शाळाच बंद राहण्याची नामुष्की ओढवली.
शिक्षक शाळेत गैरहजर असल्याची माहिती सरपंच, उपसरपंचासह शाळा समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांना मिळाली. सर्वांनी दुपारी १२.१५ वाजता भेटी दिली. दरम्यान, एकही शिक्षक उपस्थित नसल्याचे आढळून आले. पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून पंचायत समितीकडे याबाबत तक्रार केली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष वैशाली गहाणे, उपाध्यक्ष कानू भोयर, तंटामुक्त समिती अध्यक्ष देवराव ठलाल, पोलीस पाटील सुरेश टेकाम, उपसरपंच फाल्गुन फुले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य फाल्गुन मेश्राम, यादव मानकर, नवनाथ कोटनाके, दीपक भोयर, प्रकाश ठाकूर, कुमार शिंदे, प्रफुल बावणे, हिराजी मानकर, अमोल मेश्राम उपस्थित होते.
मुख्यालयाची सक्ती करा
घाटी येथील शिक्षक शाळेत नियमित उपस्थित राहत नाही. वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. शाळेतील तिन्ही शिक्षकांना मुख्यालयाची सक्ती करून कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे, तसेच येथील एका शिक्षकाचे रिक्त असलेले पद लवकर भरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यावे, अशी मागणी पालकांनी पंचायत समितीकडे तक्रारीद्वारे केली आहे.