...अन् संतप्त रोहयो मजुरांनी केले कामबंद आंदोलन
By admin | Published: June 13, 2017 12:39 AM2017-06-13T00:39:56+5:302017-06-13T00:39:56+5:30
दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले.
बेलगाव येथील प्रकार : अभियंत्याच्या चुकीमुळे मिळत होती कमी मजुरी, मजुरांच्या अपरोक्ष कामाचे मोजमाप केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले.
तालुक्यातील बेलगाव येथे जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या मार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामावर गावातील ३०० पेक्षा अधिक मजूर कामावर आहेत. मागील एक आठवड्यापासून हे काम सुरू आहे. ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता सिंचन विभागाचे शाखा अभियंता कुंभारे यांनी कामाला भेट देऊन कामाचे मोजमाप केले. यावेळी मोजकेच मजूर उपस्थित होते. मोजमापानंतर प्रत्येक मजुराला दिवसाची केवळ ७० ते ९० रूपये मजुरी पडत असल्याचे मजुरांच्या लक्षात आले. ही बाब मजुरांना माहित होताच ते संतप्त झाले. जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, पं.स. सदस्य संध्या नैताम यांच्या नेतृत्वात रोहयो मजुरांनी सोमवारी सकाळीच कामबंद आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलनाची माहिती पं.स. सभापती गिरीधारी तितराम, सिंचन विभागाचे उपअभियंता राऊत, शाखा अभियंता कुंभारे यांना देऊन रोहयो कामावर पाचारण केले. यावेळी मजुरांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. मजुरांचा संताप लक्षात घेऊन मानवी दृष्टीकोनातून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत करण्याचे आश्वासन अभियंत्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले व मजूर कामावर परतले. नेमकी किती मजुरी पडणार आहे, याचे पत्ते मात्र सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे उघडले नाही.
उन्हाळ्यात मातीचे खोदकाम त्रासदायक
सिंचन विभागाच्या मार्फत मे, जून महिन्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. या कालावधीत जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला राहतो. त्यामुळे जमीन कडक येते. परिणामी खंती व इतर अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करणे कठीण होते. ही बाब अधिकारी वर्गाला माहित नाही. मातीची कामे डिसेंबर, जानेवारी महिन्यातच सुरू करणे आवश्यक आहे. या कालावधीत मातीत ओलावा राहत असल्याने खोदकाम करणे कमी त्रासाचे होते. कमिशनच्या लालसेपोटी सिंचन विभागाचे अभियंते यंत्राच्या माध्यमातूनच रोहयोची कामे करण्यास अधिक पसंती दर्शवितात. मात्र मजुरांकडून कामे होत नसल्याने शासनाकडून दबाव वाढतो. शासनाला केवळ देखावा म्हणून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सिंचन विभाग रोहयो कामांना सुरूवात करते, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांनी केला आहे.