अन् मुलीची भेट होण्याआधीच पित्याचे प्राणपाखरू उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:05 AM2018-05-16T01:05:38+5:302018-05-16T01:05:38+5:30

मुलगी कितीही मोठी झाली तरी पित्याबद्दलची तिची आस्था आणि प्रेम तसुभरही कमी होत नाही. एवढेच नाही तर पित्यालाही तिच्याबद्दलचा जिव्हाळा तेवढाच कायम असतो. अशाच जिव्हाळ्यातून तब्बल ११०० किलोमीटरचा प्रवास करत एक पिता मुलीच्या घरी तिला भेटण्यासाठी निघाला.

And before the girl's visit, the father's love affair | अन् मुलीची भेट होण्याआधीच पित्याचे प्राणपाखरू उडाले

अन् मुलीची भेट होण्याआधीच पित्याचे प्राणपाखरू उडाले

Next
ठळक मुद्देनियतीचा असाही खेळ : ११०० किलोमीटरच्या प्रवासानंतर कायमची ताटातूट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलगी कितीही मोठी झाली तरी पित्याबद्दलची तिची आस्था आणि प्रेम तसुभरही कमी होत नाही. एवढेच नाही तर पित्यालाही तिच्याबद्दलचा जिव्हाळा तेवढाच कायम असतो. अशाच जिव्हाळ्यातून तब्बल ११०० किलोमीटरचा प्रवास करत एक पिता मुलीच्या घरी तिला भेटण्यासाठी निघाला. आता काही तासातच मुलीची, नातवांची भेट होणार अशी आस त्या पित्याला लागली होती. पण नियतीने ही भेट होण्याआधीच कारमध्ये बसलेल्या त्या पित्याचे प्राण हिरावले.
नियतीच्या या खेळात बळी पडलेल्या त्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे बच्चूभाई पटेल (७०). गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील चिकोदरा या गावचे रहिवासी असलेले बच्चूभाई आपले जावई गडचिरोलीतील पटेल सायकल स्टोअरचे संचालक कमलेश पटेल यांच्याकडे येण्यासाठी निघाले होते. अनेक महिन्यांनी वडिल येत आहे म्हणून त्यांची मुलगी एकता यांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून ठेवले होते. नातवंडही त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. सोमवारी सायंकाळी गडचिरोलीत पोहोचण्यापूर्वी थकव्यामुळे बच्चूभाईंनी दुपारी नागपूरमध्ये थोडी विश्रांती करून त्यांची कार गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाली.
४.३० वाजताच्या सुमारास कार नागभीडजवळ पोहोचल्यानंतर चालकाने इंधन टाकण्यासाठी कार पेट्रोल पंपावर नेली. कारमध्ये इंधनही टाकले, पण पैसे मागण्यासाठी मागील सीटवर बसलेल्या बच्चूभाईंना आवाज दिला असता त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही. जवळ जाऊन पाहतो तर काय, बच्चूभाईंचा श्वास थांबला होता. सोबतच्या सहकाऱ्याने आणि कारचालकाने तिथेच एका रुग्णालयात नेऊन पाहिले. पण त्यांचा श्वास आता कधीही सुरू होणार नव्हता.
अचानक हे कसे झाले म्हणून कारचालकही हबकून गेला. त्याने नातेवाईकांकडे संपर्क केला. पण जिच्याघरी जाण्यासाठी निघालो त्या मुलीला ही बातमी कशी द्यायची या विवंचनेतच कार गडचिरोलीत दाखल झाली. वडील आले म्हणून मुलीसह नातवंडांनी कारकडे धाव घेतली. पण कारमध्ये बच्चूभाईं चिरनिद्रेत असल्याचे पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला. मुलीच्या भेटीसाठी तब्बल ११०० किलोमीटरचा कार प्रवास करून गुजरातवरून आलेल्या पित्याचा असा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटनेने अनेक जण हळहळले.

Web Title: And before the girl's visit, the father's love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू