...अन् पोलिसांनी मामा बनून लावून दिले तिचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:20+5:302021-06-25T04:26:20+5:30
बुर्गीचे माजी उपसरपंच रामा तलांडी यांची भाची सपना मंथनवार हिचा विवाह निश्चित झाला होता; पण घरची परिस्थिती हलाकीची असताना ...
बुर्गीचे माजी उपसरपंच रामा तलांडी यांची भाची सपना मंथनवार हिचा विवाह निश्चित झाला होता; पण घरची परिस्थिती हलाकीची असताना मोठा आधार असणाऱ्या मामाची ऐन लग्नापूर्वी नक्षल्यांनी हत्या केली. त्यामुळे मंथनवार कुटुंबापुढे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली. सपनाच्या आईने बुर्गी येथे येऊन त्यांची अडचण पोलीस मदत केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगितली. त्यांची परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांसह सर्व अंमलदार व इतर कर्मचाऱ्यांनी सपनाच्या लग्नासाठी स्वेच्छेने मदत करण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी लागणारे किराणा साहित्य, तसेच संसारोपयोगी सर्व भांडी विवाहस्थळी हजर राहून सपनाला भेट दिली.
(बॉक्स)
उपस्थितांनी केला हत्येचा निषेध
लग्नाला हजर असलेल्या लोकांनी रामा तलांडी यांच्या हत्येचा निषेध करून जिल्हा पोलीस दल संकटात आपल्या मदतीला धावून आल्याची भावना व्यक्त केली. सपनाच्या कुटुंबीयांनीही पोलिसांनी वेळेवर मदतीचा हात पुढे केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बुर्गीचे प्रभारी पोलीस अधिकारी कैलास आलुरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, श्रीकृष्ण शिंदे व इतर कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.