अन् रानडुक्कर शिरले शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 01:31 AM2017-04-21T01:31:31+5:302017-04-21T01:31:31+5:30
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कनेरी-राम येथील जिल्हा परिषद शाळेत एक रानडुक्कर शिरले.
एक शिक्षक जखमी : मोठी दुर्घटना टळली
सडक-अर्जुनी : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कनेरी-राम येथील जिल्हा परिषद शाळेत एक रानडुक्कर शिरले. यात एक शिक्षक जखमी झाला. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरूवार (दि.२०) सकाळी ८.१० वाजता घडली.
सकाळच्या पाळीत शाळा सुरू असताना विद्यार्थी प्राणायामाचे धडे गिरवित होते. त्याचवेळी अचानक रानडुक्कर शाळेच्या आवारात घुसले. मुलांच्या अंगावरून उडी मारून शाळेच्या आवारात धावू लागले. विद्यार्थ्यांना इजा होऊ नये म्हणून वर्गशिक्षकांनी वर्गाचे दार बंद केले. त्या रानडुकराला सुरक्षाभिंतीच्या बाहेर काढण्यासाठी शिक्षक मधुकर विश्वनाथ येरणे व गावकरी भागवत तिमाजी तरोणे प्रयत्न करीत होते. मात्र रानडुकराने त्यांना धक्का दिला. यात येरणे जखमी झाले तर भागवत यांच्या पायाला दुखापत झाली. रानडुकर वर्गखोलीत शिरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पण कनेरीचे उपसरपंच प्रेमलाल मेंढे, गावकरी व शिक्षकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. गावकरी त्या रानडुकराला बाहेर जंगलात पळविण्यासाठी लागले असताना ते सुरक्षाभिंतीवरून उडी मारून पळून गेले. वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, वनक्षेत्र सहायक गौतम, वनरक्षक पटले यांनी चौकशी केली.(शहर प्रतिनिधी)