रेती तस्करीत आंध्र प्रदेशच्या ट्रकचा समावेश
By admin | Published: May 28, 2016 01:32 AM2016-05-28T01:32:35+5:302016-05-28T01:32:35+5:30
तालुक्यातील येल्ला येथील नदीघाटावर रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या आठ ट्रकवर मुलचेरा तहसीलदारांनी कारवाई केली आहे.
मुलचेरा तहसीलदारांची कारवाई : २ लाख २६ हजार ८०० रूपयांचा दंड ठोठावला
मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील नदीघाटावर रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या आठ ट्रकवर मुलचेरा तहसीलदारांनी कारवाई केली आहे. यातील पाच ट्रक आंध्र प्रदेशचे आहेत. यावरून रेती तस्करीचे कनेक्शन आंध्र प्रदेशासोबत जोडले असल्याचे स्पष्ट होत आहे.
येल्ला नदीघाटावरून अवैधरीत्या विना परवाना रेतीचा वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार पी. जे. अप्पाले यांना प्राप्त झाली. त्यानुसार २६ मे रोजी नदीघाटावर जाऊन दोन रिकामे व सहा रेतीने भरलेले ट्रक जप्ती केले. जप्ती केलेल्या ट्रकमध्ये दोन महाराष्ट्रातील व तीन आंध्र प्रदेशातील ट्रकचा समावेश आहे. एम. एच. ४० वाय ६४८५, एम. एच. ३४ एम ७६९० या क्रमांकाचे ट्रक रिकामे आढळून आले. तर ए. पी. ०१८- ४०६७, ए. पी. ०१८- ४५२४, ए. पी. ०१८- ३५५५, ए. पी. ०१८- ८८९२, टी. एस. ०१ यू. ए. ३१२९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेती भरली असल्याचे आढळून आले. रेतीची वाहतूक करणारे दीपक राठोड यांनी दंडाची २ लाख २६ हजार ८०० रूपये एवढी रक्कम भरल्यानंतर ट्रक सोडण्यात आले. सदर कारवाई तलाठी रितेश चिदमवार, मंडळ अधिकारी सत्यवान भडके, नायब तहसीलदार समशेर पठाण यांनी केली. विशेष म्हणजे रेती ताडपत्री झाकून नेली जात होती. गडचिरोली जिल्ह्यातील इतर घाटांवरूनही रेती तस्करी सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)