बालकांना अॅनिमियाचा विळखा
By admin | Published: September 18, 2015 01:12 AM2015-09-18T01:12:23+5:302015-09-18T01:12:23+5:30
ग्रामीण व दुर्गम भागातील बालके अॅनिमिया (रक्ताची कमतरता) व त्वचारोगाने त्रस्त असून आरोग्य विभागाच्या मार्फतीने अंगणवाडी व शाळांमधील विद्यार्थ्यांची करण्यात आलेल्या ..
व्हिटॅमीनचीही कमतरता : बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणीतील निष्कर्ष
दिगांबर जवादे गडचिरोली
ग्रामीण व दुर्गम भागातील बालके अॅनिमिया (रक्ताची कमतरता) व त्वचारोगाने त्रस्त असून आरोग्य विभागाच्या मार्फतीने अंगणवाडी व शाळांमधील विद्यार्थ्यांची करण्यात आलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे. अॅनिमिया रोगाने जिल्ह्यात १३०३ बालके व त्वचारोगाने ३ हजार १६२ मुले ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी व शालेय बालकांचे प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन डॉक्टरांच्या मार्फतीने तपासणी केली जाते. तपासणीमध्ये एखादा बालक आजाराने ग्रस्त आढळून आल्यास त्याला त्याचवेळी औषधोपचार व मार्गदर्शन केले जाते. बालकाची प्रकृती गंभीर असल्यास किंवा त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्यास त्याला संबंधित रूग्णालयात रेफर केले जाते. संबंधित बालकाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केली जाते. या सर्व कामात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे अधिकारी व डॉक्टर विशेष काळजी घेतात.
याच कार्यक्रमांतर्गत २ हजार १२१ अंगणवाडीमधील ७५ हजार ९३८ बालकांची एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ हजार १७३ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पहिली ते बाराव्या वर्गापर्यंतच्या ५३१ शाळांमधील ३५ हजार ७४५ विद्यार्थ्यांची जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९ हजार ५१९ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे दिसून आले. त्यांच्यावरही औषधोपचार करण्यात आला.
शाळांच्या तपासणीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील बालके प्रामुख्याने अॅनिमिया, त्वचारोग, कुपोषीतपणा व विटॅमिनची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. तपासणीदरम्यान अॅनिमिया रोगाने १ हजार ३०३, त्वचारोगाने ३ हजार १६२ ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. व्हिटॅमिन ए ची कमतरता असलेले ३६८ व विटॅमिन डी ची कमतरता असलेले ५८ बालके आढळून आली आहेत. गरोदरपणात योग्य आहार न घेणे, बाळाच्या जन्मानंतरही त्याला पौष्टिक आहार न मिळणे, कामामुळे बाळाला मातेचे दूध वेळेवर न मिळणे आदींमुळे अॅनिमिया रोगाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात जास्त असल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर शरीराच्या स्वच्छतेबाबत योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे त्वचारोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
शरीराच्या स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जात असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्वचारोग पसरत असल्याचे तपासणीदरम्यान दिसून आले आहे. अॅनिमिया रोगाने ग्रस्त बालके काही दिवसातच कुपोषणाच्या विळख्यात सापडतात. त्यानंतर त्यांची कुपोषणापासून मुक्तता करताना आईवडीलासंह आरोग्य विभागाची दमछाक उडते. त्यामुळे आरोग्य विभागाने आरोग्याबाबत व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.
शाळा तपासणीला जातेवेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन करून शाळा तपासणीला येत असल्याची माहिती दिली जाते. मात्र बऱ्याच शाळांमध्ये निम्मेही विद्यार्थी उपस्थित राहत नाही. त्यामुळे आरोग्य तपासणीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठताना अडचण येते. एकाच शाळेमध्ये दोन ते तीन वेळा जावे लागते. या कार्यक्रमातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही आरोग्य तपासणी करताना अडचण येते. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रियेचा निधी वाढविल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होण्यास मदत होईल.
- प्रिती समनवार, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
शस्त्रक्रिया करताना निधीची अडचण
शाळा तपासणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, असे दिसून येते त्या विद्यार्थ्यावर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केली जाते. मात्र या योजनेची मर्यादा केवळ दीड लाख रूपये आहे. कीडणी कॅन्सर यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च कधीकधी दीड लाख रूपयांपेक्षा जास्त राहते. त्यावेळी उर्वरित पैसे भरण्यास पालक तयार होत नाही, अशा रूग्णांची शस्त्रक्रिया करताना अडचण येते. मागील दोन महिन्यात २८ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
रिक्त पदांनी अडचण वाढली
जिल्ह्यातील इतर विभागाप्रमाणेच बाल स्वास्थ कार्यक्रमसुध्दा रिक्त पदांच्या विळख्यात सापडला आहे. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक या प्रमाणे १२ पथके आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता व परिचारिका यांची एकूण ८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६६ पदे भरली आहेत व १९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मंजूर आठ पदांपैकी सात पदे रिक्त आहेत. केवळ परिचारिकेचे पद भरण्यात आले आहेत. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांची तपासणी करताना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.