बँकेच्या मदतीने अंगणवाडी व शाळा स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 12:52 AM2017-06-06T00:52:13+5:302017-06-06T00:52:13+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुर्गम व आदिवासी बहूल भागातील पाच अंगणवाड्या व पाच शाळा दत्तक घेऊन..

Anganwadi and school smart with the help of bank | बँकेच्या मदतीने अंगणवाडी व शाळा स्मार्ट

बँकेच्या मदतीने अंगणवाडी व शाळा स्मार्ट

Next

मान्यवरांकडून कौतुक : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुर्गम व आदिवासी बहूल भागातील पाच अंगणवाड्या व पाच शाळा दत्तक घेऊन या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्वच शाळा व अंगणवाड्यांमध्ये कॉन्व्हेंटप्रमाणे सर्वसोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी भामरागड तालुक्यातील मलमपोड्डूर व भामरागड येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन सोयीसुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर या अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन प्रंचित पोरेड्डीवार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, जिल्हा व बालविकास अधिकारी लखोटे, बँकेचे अधिकारी राजू सोरते, किरण सांबरे, राहूल गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
बालक व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, बालकांना पोषण आहार पुरवून त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे ही महत्त्वाची जबाबदारी अंगणवाड्यांवर आहे. मात्र बहुतांश अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सोयीसुविधाच उपलब्ध नाहीत. परिणामी या अंगणवाड्या शासनाकडून आलेला पोषण आहार देण्याचे केंद्र बनले आहे. शासनाचेही अंगणवाड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी बँकेला काही अंगणवाड्या व शाळा दत्तक घेण्याची विनंती केली. त्यानुसार बँकेने पाच शाळा व पाच अंगणवाड्या दत्तक घेतल्या.
या अंगणवाड्या व शाळांमध्ये स्वत:च्या निधीतून आधुनिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. कॉन्व्हेंटच्या इमारतीप्रमाणे इमारत सुसज्ज करण्यात आली आहे.
अंगणवाडी व शाळेमध्ये सुविधा बघून गावकरी व उपस्थित मान्यवरही आश्चर्यचकीत झाले आहेत. प्रत्येक अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यासाठी जवळपास दीड ते दोन लाख रूपयांचा खर्च आला आहे. या अंगणवाड्या इतर अंगणवाड्यांसाठी आदर्श ठरणार आहेत.

सुविधा पुरविलेल्या शाळा व अंगणवाड्या
जिल्हा बँकेने स्वत:च्या निधीतून भामरागड तालुक्यातील भामरागड, मल्लमपोडूर, एटापल्ली तालुक्यातील तोडसा, गेदा व कोरची तालुक्यातील कोचीनारा येथील अंगणवाड्यांमध्ये सुविधा पुरविल्या आहेत. तसेच भामरागड तालुक्यातील लाहेरी, मन्नेराजाराम, ताडगाव व एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, दोलंदा, जिल्हा परिषद शाळांमध्येही सुविधा पुरविल्या आहेत.
बँकेच्या वतीने अंगणवाडी केंद्रांना सौर विद्युत संच, एलईडी टीव्ही, वॉटर प्युरिफायर, खेळणे, सुशोभीकरण, रंगरंगोटी आदी सुविधा पुरविल्या आहेत. तर जिल्हा परिषद शाळांना एॅडराईड टीव्ही व एलईडी टीव्ही उपलब्ध करून दिल्या आहेत.

Web Title: Anganwadi and school smart with the help of bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.