अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:24 AM2019-08-10T00:24:22+5:302019-08-10T00:24:50+5:30
विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून वाढीव मानधनाचा अध्यादेश काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून वाढीव मानधनाचा अध्यादेश काढला आहे. मात्र अजूनपर्यंत वाढीव मानधन देण्यात आले नाही. २०१४ पासून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या मानधनाची ५० टक्के रक्कम दरमहा पेन्शनमधून देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन, प्रवास भत्ता व इंधन बिल त्वरीत द्यावे. रिक्त असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरीत भराव्या. अंगणवाडी केंद्राचे विद्युत बिल भरण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्यावे. आजारपणाची एक महिन्याची भरपगारी सुटी द्यावी. उन्हाळ्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेप्रमाणे सुट्या द्याव्या. मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावे. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र इमारत बांधून द्यावी. किरकोळ खर्चाची रक्कम वाढवून सहा हजार रुपये करावी. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन करावे. आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले. निवेदन देतेवेळी आयटकचे राज्य सचिव देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार, अॅड. जगदिश मेश्राम, अमोल मारकवार, राधा ठाकरे, मिनाक्षी झोडे, म.रा. कुरंजेकर, जहारा शेख, ज्योती कोमलवार, शाहीस्ता शेख, रेखा जांभुळे, अनिता अधिकारी, रूपा पेंदाम, वसंती अंबादे, शिवलता बावणथडे, कौशल्या गोंधोळे, अल्का कुनघाडकर, कुंदा बंजवार, ज्योती कोल्हापुरे आदी उपस्थित होते.