विविध मागण्यांसाठी संतप्त नागरिक तीन तास रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:14+5:302021-07-05T04:23:14+5:30
दक्षिण अहेरी उपविभागामधील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येतो, परंतु कमलापूर क्षेत्रातील जवळपास ६० गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ...
दक्षिण अहेरी उपविभागामधील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येतो, परंतु कमलापूर क्षेत्रातील जवळपास ६० गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दुर्गम भागात जाण्यासाठी पक्के रस्ते नाही, अनेक भागात विद्युत सेवा पोहोचली नाही. अपेक्षित विकास कोणत्याही या भागात झालेला नाही. लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी भ्रष्टाचार निवारण समिती व गावकऱ्यांकडून सिरोंचा मार्गावर कमलापूर फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात ३ तास वाहतूक पूर्णपणे या राष्ट्रीय महामार्गावर बंद होती.
या आंदोलनात ग्रामसभा पॅनल अध्यक्ष रजनीता मडावी, जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे संतोष ताटीकोंडावार, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे, राजेंद्र चौधरी, अमोल भट, कैलास कोडापे, प्रकाश दुर्गे तसेच २० गावांतील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बाॅक्स :
या आहेत प्रमुख मागण्या
अतिक्रमणधारकांची तीन पिढीच्या पुराव्याची अट रद्द करावी, छल्लेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, वनमजुरांची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, कमलापूर येथे मंजूर असलेले मंडळ कार्यालय बांधकाम करावे, कमलापूर येथे मंजूर असलेले ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, दामरंचा बससेवा व ३जी नेटवर्क सुरू करावे, लक्कामेंडा पहाड पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून विकासातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, कमलापूर येथे महाविद्यालय निर्माण करावे, वनउपज गोळा करण्यासाठी व्यवस्था व खरेदी व विक्री केंद्र सुरू करावे, आलापल्ली-सिरोंचा मार्गाची चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावेत, अहेरी-सिरोंचा व्हाया कमलापूर छल्लेवाडा राजाराम मार्गे बससेवा सुरू करावी, कमलापूर येथे नवीन तलावाचे शिल्लक खोलीकरण व कॅनल बांधकाम करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
बाॅक्स :
तीन तासांनंतर चारचाकी वाहनधारकांना दिलासा
सदर रास्ता रोको आंदोलनस्थळी नायब तहसीलदार फारुक शेख, मंडळ अधिकारी आर. पी. सिडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना त्यांच्या समस्या वरिष्ठांपर्यंत पाेहोचविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन थांबवून दळणवळणासाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
040721\img_20210704_070100.jpg
*विविध मागण्यांसाठी 3 तास नागरीक रस्त्यावर.*