संतप्त जुन्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 12:52 AM2016-02-13T00:52:24+5:302016-02-13T00:52:24+5:30
जुन्या फवारणी कर्मचाऱ्यांना कामातून डावलून नव्या फवारणी कर्मचाऱ्यांची भरती करून प्रशासनाने अन्याय केला.
कामातून कर्मचाऱ्यांना वगळले : पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर आरोप
गडचिरोली : जुन्या फवारणी कर्मचाऱ्यांना कामातून डावलून नव्या फवारणी कर्मचाऱ्यांची भरती करून प्रशासनाने अन्याय केला. त्यामुळे उपासमारीची पाळी कामगारांवर आली. कामगारांना पुन्हा कामावर सामावून घ्यावे या मागणीसाठी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या बॅनरखाली जुन्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा हिवताप अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या निकाली न काढल्यास साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला होता. मात्र जुन्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
पहिल्या दिवशी शुक्रवारला देविदास कुकडे, गजानन कोठारे, नक्टूजी भुरसे, लीलाधर सोमनकर, भाऊजी किरमे, आदी पाच फवारणी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. या उपोषण मंडपात संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष उमेश कंदीकुरवार, अनिल वासेकर, राजू मोगरे, नेवाजी वालदे, मणिराम चंदनमल्लवार, विजय गोरेड्डीवार, काशिनाथ भांडेकर, जयंत टिकले, राजू सोमनकार, दौलत कोंडागुर्ले, महादेव करमरकर, राहूल लाडे, मोरेश्वर बारसागडे, माधव दुर्गे, ज्ञानेश्वर सोनुले, मुखरू मुनघाटे, दामोधर मुनघाटे, लोमेश उंदीरवाडे, सुनिलाल सहारे आदी हंगामी फवारणी कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
नव्या ८३९ कर्मचाऱ्यांची पदभरती रद्द करा
जुन्या हंगामी फवारणी कामगारांना डावलून नवीन ८३९ कर्मचाऱ्यांची केलेली पदभरती रद्द करावी, फवारणी कामगारांना ११ महिन्यांचे काम देण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, आरोग्य सेवक पुरूष वर्ग ३ व वर्ग ४ यांचे सरळसेवेने समावेशन करण्यात यावे, प्रथम नियुक्तीचे दिनांक लक्षात घेऊन सेवेत सामावून घ्यावे, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्ष पूर्ण झाले. त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी.