संतप्त नागरिकांनी काढली ‘स्वच्छते’ची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:02 AM2018-01-05T00:02:29+5:302018-01-05T00:02:46+5:30
अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील मुख्य रस्त्यावर घाण पसरली असून मोकाट पाळीव जनावरांमुळे आवागमन करण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. गावातील स्वच्छताच मृतप्राय झाली असे मानून मुद्यावर ग्रामस्थांनी गुरूवारी चक्क स्वच्छतेची अंत्ययात्रा काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील मुख्य रस्त्यावर घाण पसरली असून मोकाट पाळीव जनावरांमुळे आवागमन करण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. गावातील स्वच्छताच मृतप्राय झाली असे मानून मुद्यावर ग्रामस्थांनी गुरूवारी चक्क स्वच्छतेची अंत्ययात्रा काढली. ग्राम पंचायत प्रशासनाच्या विरोधात अभिनव पद्धतीने प्रचंड रोष व्यक्त केला.
गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्यामुळे ग्राम पंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी केली. यामध्ये जिमलगट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुष्पाप्रियादेवी हायस्कूल, लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गुंड सतू यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व भाषणातून पटवून दिले. यावेळी पुष्पप्रियादेवी शाळेचे मुख्याध्यापक दुर्गे, गज्जमवार, मुख्याध्यापक सुरेश कुमरे, महेश मदेर्लावार, सागर पद्मट्टीवार, सुनील रापत्तीवार, सुनील मेश्राम हजर होते.