संतप्त शिवसैनिकांची वीज कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 02:00 AM2017-07-13T02:00:26+5:302017-07-13T02:00:26+5:30
गेल्या वर्षभरापासून कुरखेडा तालुक्यातील वीज ग्राहकांना घरगुती वीज देयके अवाजवी प्रमाणात दिले जात आहे.
अवाजवी वीज देयके बंद करण्याची मागणी : बिलात सुधारणा करण्याचे अभियंत्यांनी दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गेल्या वर्षभरापासून कुरखेडा तालुक्यातील वीज ग्राहकांना घरगुती वीज देयके अवाजवी प्रमाणात दिले जात आहे. सदर वीज देयके कमी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना वीज वितरण कार्यालयाकडून उडावाउडवीचे उत्तरे दिली जातात. शिवाय वीज बिलात सुधारणा करून देण्यास टाळाटाळही केली जाते. त्यामुळे संतप्त शिवसैनिक व वीज ग्राहकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात बुधवारी थेट कुरखेडा येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.
यावेळी शिवसैनिकांनी अधीक्षक व शाखा अभियंता चव्हाण यांना घेराव केला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे निवेदन अभियंता चव्हाण यांनी स्वीकारले. उपकार्यकारी अभियंता मुरकुटे हे बैठकीसाठी चंद्रपूर येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी दूरध्वनीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. वीज बिल कमी करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंशी, माजी जि. प. सभापती निरांजनी चंदेल, आशिष काळे, विजय पुस्तोडे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, सभापती सोनू भट्टड, घिसू खुणे आदी हजर होते.