संतप्त महिलांनी काढली दारूबंदीची मशाल रॅली; गावातील दारूविक्रेत्यांना दिली सक्त ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:22 PM2024-10-07T15:22:23+5:302024-10-07T15:23:23+5:30
Gadchiroli : चरवीदंड येथे रॅली काढून दारूबंदीचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील चरवीदंड, पालापुंडी येथील शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी गावात दारूबंदी मशाल रॅलीच्या माध्यमातून दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली. तसेच सभेच्या निर्णयाचे उल्लंघन करीत दारूविक्री केल्यास ५० हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. दारूबंदीची ही मशाल रॅली शनिवारी काढण्यात आली.
चरवीदंड येथे चरवीदंड, पालापुंडी, येडसकुही या गावातील महिलांची सभा ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्त समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तंमुसचे अध्यक्ष मोतीराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यानंतर अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन दारूविक्रेत्यावर ५० हजार रुपये दंड, ग्रामपंचायत द्वारे शासकीय दाखले व कागदपत्रे बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. महिलांच्या निर्णयाचे स्वागत करीत तिन्ही गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी महिलांना पूर्ण पाठिंबा दिला व स्वतःही दारूमुक्त समितीमध्ये सहभागी झाले. पालापुंडी व चरवीदंड येथे मुक्तिपथ शक्तिपथ समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग दर्शविला.
सभेला सरपंच भोपाल कुंबरे, उपसरपंच केशीकला गोर्टकर, शामराव कुंबरे, ग्रामसेविका रसिका सिडाम, पोलिस पाटील नामदेव मडावी, रेवता कुमरे, पोलिस पाटील चेतना गोरठेकर, रमाबाई कुमरे, कौशल्या बावणे, रुखमाई जाडे, कौशल्या उसेंडी, ग्रामपंचायत सदस्य तुलावी, प्रज्ञा सहारे, माधुरी कोकोडे, शालिना कुमरे, उषा कुमरे, नीलम बावणे, शीला कुमरे, जनाबाई उसेंडी, अर्चना कुमरे, पूजा कोकोडे, वनिता परसो, वैशाली कुडमेथे, जिजा कुंबरे, मनीषा गावडे, वच्छला मडावी, सुलोचना पुसाम, वंदना कुमरे, अनुसया बावणे आदी उपस्थित होते.
तर गावात होणार दंडात्मक कारवाई
यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने समितीचे कार्य व उद्देश पटवून देत आपल्या गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सुचविल्या. दरम्यान, सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत चरवीदंड, पालापुंडी गावातील महिलांनी दारूबंदीची मशाल रॅली काढत दारूविक्रेत्यांच्या घरी भेट दिली. त्यांना समज देत तत्काळ दारूविक्रीचा अवैध व्यवसाय थांबविण्याचे आवाहन केले. तसेच सूचनेचे पालन न करता दारूविक्री केल्यास सभेच्या निर्णयानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले.