कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:03+5:302021-07-30T04:38:03+5:30

कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात ...

Animal damage to crops due to lack of fencing | कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान

कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान

Next

कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

वाहनांचा लिलाव करा

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत.

‘ती’ झाडे धाेकादायक

गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची मागणी हाेत आहे.

पशुपालक त्रस्त

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे.

थ्री-जी सेवा प्रभावित

सिरोंचा : सिरोंचा येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे.

वीज तारांनजीकच्या झाडांच्या फांद्या तोडा

चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये विजेच्या तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘महावितरण’ने वीजतारांलगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तृतीय व चतुर्थ श्रेणीतील भरती करावी

गडचिराेली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागांतील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर बंदी घातली; तर दुसरीकडे ग्रामीण भागात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे.

आरमोरीत स्वच्छतागृहे बांधा

आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

तलावाच्या नहरात झुडपी जंगल

चामाेर्शी : तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र, तलावाच्या नहराची दुरवस्था झाली असून, झुडपे वाढली आहेत. भविष्यात शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नहराच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

श्रावणबाळ लाभार्थ्यांना मानधन द्या

अहेरी : जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून, त्यांना तातडीने मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. मात्र, त्यांना नियमित मानधन देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सातत्याने मागणी करूनही दिरंगाईचा प्रश्न सुटला नाही.

मैदानी खेळांबाबत जनजागृती गरजेची

कुरखेडा : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. मोबाइल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाइलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळांची गरज आहे.

तलाठ्यांचा मुख्यालयाला खाे

चामोर्शी : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी सजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे. सध्या तलाठ्यांनी रहिवासी व जातीचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे तलाठ्यांचे अप-डाऊन वाढले.

नाली उपशाचे काम ढेपाळले

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण काढावे, अशी मागणी आहे.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले, परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जाते. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.

सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा

सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही.

औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज

धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.

कुरखेडातील गावांना लाइनमनच नाही

कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावात राइसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

पन्न्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही

देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लॅस्टिक पन्न्यांचा वापर करतात. येथील राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड व गांधी वॉर्डातील अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लॅस्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. नाल्यांमध्ये प्लॅस्टिक व पन्न्या टाकल्या जात असल्याने सांडपाणी निचरा हाेण्याचा मार्ग बंद झाला आहे. कारवाईची नितांत गरज आहे.

रेपनपल्ली मार्गावरील पूल कालबाह्य

कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे, तसेच या रस्त्यावर असलेले पूलही जीर्ण अवस्थेत आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहते. वेळोवेळी वाहतूक खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

चामोर्शी : शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कचरा, तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या डुकरांपासून बालकांना धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भामरागड तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित

भामरागड : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. भामरागड तालुक्यातील बिनागुंडासह अन्य पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही.

Web Title: Animal damage to crops due to lack of fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.