पशुखाद्य महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:30 AM2021-01-04T04:30:14+5:302021-01-04T04:30:14+5:30
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध ...
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे पशुपालकांना पशूंचे खाद्य खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे माेजावे लागत आहेत.
जनजागृतीचा अभाव
आष्टी : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात या योजनेबाबत जनजागृती नाही. त्यामुळे या याेजनेचा लाभ मिळण्यास अडचणी आहेत. लाभार्थी वाढविण्यासाठी याेजनेची जागृती करणे आवश्यक आहे.
मातीच्या बांधाचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण करण्याची गरज आहे.
रेगडी येथे बँक शाखा स्थापन करा
घोट : घोटपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, जि. प. उच्च प्राथमिक शाळा आहेत.
औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.
लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
पाण्याचा अपव्यय
देसाईगंज : शहरात सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना बऱ्याच ठिकाणी तोटी नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी विनाकारण वाहून जात आहे. वाॅर्डांमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तत्काळ तोटी बसविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंचन सुविधेचा अभाव
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण वाढले
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे.
नाली व रस्ते बांधा
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाली व रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी हाेत आहे.