अंनिसने घेतली पीडित मडावी कुटुंबाची भेट
By admin | Published: March 12, 2017 01:59 AM2017-03-12T01:59:17+5:302017-03-12T01:59:17+5:30
एटापल्ली तालुक्यातील कांदोळी (बुर्गी) येथे जादूटोणाच्या संशयावरून मारहाण झालेल्या पोहरी मिर्या मडावी हिची व तिच्या कुटुंबीयांची
कांदोळीतील जादूटोणा प्रकरण : दुर्गम भागात कायद्याची जनजागृती करणार
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील कांदोळी (बुर्गी) येथे जादूटोणाच्या संशयावरून मारहाण झालेल्या पोहरी मिर्या मडावी हिची व तिच्या कुटुंबीयांची अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन घटनेबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच दवाखान्यात भरती असलेल्या पोहरी मिर्या मडावी हिच्यासोबतही शिष्टमंडळाने चर्चा केली.
पोहरी मिर्या मडावी हिने गावातील पोलीस पाटील व सरपंच एकाच कुटुंबातील असून त्यांचे कुटुंबातील चिन्ना मडावी हा वनरक्षक होता. त्याने आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येस पोहरीस जबाबदार असल्याचे भामरागड तालुक्यातील बोटणफुंडीचा पुजारी सोमा पुंगाटी याने सांगितले. त्याच्या सांगण्यावरून आरोपीने पोहरी व मडावी कुटुंबियास बेदम मारहाण केली. यात पोहरीला सर्वाधिक मार लागला. पोहरीला मराठी भाषा येत नसल्याने अहेरी तालुक्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा. हलामी यांनी माडिया भाषेत संवाद साधून तिच्याकडून अहेरी उपजिल्हा रूग्णालयात सर्व माहिती जाणून घेतली. पोहरीवर अजुनही अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून तिच्यासोबत मुलगा साईनाथ मिर्या मडावी हा राहतो. त्याच्याशीही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला. सदर घटना अतिशय निदंनिय व घृणास्पद असल्याचे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे. पोहरीचा मुलगा साईनाथ हा नागपूर येथे एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाला शिकत आहे. अंनिसच्या या शिष्टमंडळात अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक जगदिश बद्रे, संघटनेचे अहेरी तालुका कार्याध्यक्ष प्रा. हलामी, दब्बा आदी उपस्थित होते. यावेळी अंनिस शिष्टमंडळाने एटापल्ली पोलीस ठाण्यातही जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कन्ना मडावी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी डॉ. कन्ना मडावी यांनी कांदोळी भागात लोकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर अंधश्रध्दा आहे. शासनाकडून लोकजागृती होणे गरजेचे असून जादूटोणा विरोधी कायद्याची माहितीही लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)