नगरविकास सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:23 AM2018-04-23T00:23:47+5:302018-04-23T00:23:47+5:30
नगर पंचायतीच्या वतीने नगर विकास सप्ताहानिमित्त १६ ते २० एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाच्या अनुषंगाने २१ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय कार्यक्रम नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : नगर पंचायतीच्या वतीने नगर विकास सप्ताहानिमित्त १६ ते २० एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाच्या अनुषंगाने २१ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय कार्यक्रम नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका ईश्वरी बुद्धावार होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रवी रालबंडीवार, सतीश भोगे उपस्थित होते. भारत नंदनवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, नगर सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. १७ एप्रिलला वॉर्डसभा, १८ ला प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अनेक दुकानातून १६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. १९ ला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विजयी ठरलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, असे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे केली जात आहेत. याकरिता नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी, नगर पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अब्दुल एजाज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
यांचा झाला सत्कार
नगर पंचायतीच्या वतीने आयोजित सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात स्वच्छता दूत म्हणून माधव राममूर्ती वेनपल्ली यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी जिलेला देवम्मा व नागराजू सारली कलकोटा यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगर पंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातून अजिजज खान, अब्बाज खान, कार्यालयीन कामकाज क्षेत्रातील सय्यद जहीर, गोरेमिय्या, वसुली क्षेत्र (गृह पाणीकर) अब्दुल गौसशेख वजीर व स्वच्छ भारत क्षेत्रातून सतीश नानय्या दागम यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.