शासकीय गुरूदेव आश्रमशाळा घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:36 AM2017-12-03T00:36:52+5:302017-12-03T00:37:16+5:30
अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी स्वालंबन व श्रमदानातून सन १९५८ मध्ये गुरूदेव आश्रशाळेचे स्थापना केली. मात्र सदर संस्था चुकीने हस्तांतरण झाल्यानंतर या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वालंबन व श्रमदानातून सन १९५८ मध्ये गुरूदेव आश्रशाळेचे स्थापना केली. मात्र सदर संस्था चुकीने हस्तांतरण झाल्यानंतर या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या आश्रमशाळेला शासकीय गुरूदेव आश्रमशाळा म्हणून घोषित करावी, अशी मागणी कमलापूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
यासंदर्भात कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी, संतोष ताटीकोंडावार, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, विजय खरवडे, महेश मडावी व रूपा येजुलवार आदी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, तुकारामदादा गीताचार्य यांच्याकडे सदर गुरूदेव सेवा मंडळ शाळेच्या देखभालीचे काम होते. मात्र अचानक गुरूदेव सेवा मंडळातील जनार्धन गोथे या व्यक्तींनी सदर शाळा भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्था अहेरी यांच्याकडे चुकीने हस्तांतरित केली. तेव्हापासून गुरूदेव भक्तांनी अनेक आंदोलने केली. शाळा परत करतो, असे संस्थापकांनी शासन व प्रशासनाला खोटे आश्वासन दिले. मात्र ही शाळा अद्यापही गुरूदेव भक्तांना परत मिळाली नाही. तेव्हापासून या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंगची व्यवस्था नाही, संरक्षण भिंतीचा अभाव आहे, काही कर्मचाऱ्यांची पदमान्यता झालेली नाही. या समस्यांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.
१३ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करणार
कमलापूर येथील गुरूदेव आश्रमशाळा ही शासकीय गुरूदेव आश्रमशाळा म्हणून घोषित करण्यात यावी व गुरूदेव हे नाव बदलणार नाही, याची काळजी घ्यावी व येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थना मंदिराची देखभाल व दुरूस्ती शासनाने करावी, अशा मागणीचा ठराव कमलापूर ग्रामसभेने घेतला आहे. त्यामुळे ही शाळा शासकीय गुरूदेव आश्रमशाळा म्हणून घोषित करावी, अन्यथा १३ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदण्यात देण्यात आला आहे.