पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:23+5:30

२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Annual average exceeded by rainfall | पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

Next
ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता : पावसाळा संपण्याच्या महिनाभर आधीच १४२७ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासूनच दमदार पाऊस झाल्याने यावर्षीचा पावसाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. आतापर्यंत जिल्ह्यात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १०५.३५ टक्के आहे.
पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड तुटेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१४ मध्ये ११२९.९ मिमी, २०१५ मध्ये १००० मिमी, २०१६ मध्ये १५२६ मिमी, २०१७ मध्ये ८६४.२ मिमी, २०१८ मध्ये १३१५.७ मिमी पाऊस पडला आहे.
३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ११५९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १४२७.२ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या सुमारे १२३.१३ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद पडले होते. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. भामरागड तालुक्याने सुध्दा यावर्षी पावसाच्या कहराचा अनुभव अवलंबला. एटापल्ली तालुक्यातीलही नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांची वाट अडविली होती. सततच्या पावसामुळे सोयाबिन, कापूस पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतातील पिके पिवळी पडली असल्याचे दिसत आहे.

अतिवृष्टीचा इशारा
गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय यंत्रोला सतर्क राहून खबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडताना नागरिकांनी उचीत काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असल्यास शेतात जाऊ नये, असे कळविले आहे.

दोराच्या मदतीने ओलांडला पूल
भामरागड-आलापल्ली मार्गावरील तुमरगुडा नाल्याच्या पुलावरून मंगळवारी सकाळी १० वाजता पाणी चढले. पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करीत जवळपास ५० प्रवाशी थांबनू होते. मात्र कमी होण्याऐवजी वाढू लागला. त्यामुळे संबंधित प्रवाशी ताडगावकडे परत जाण्यासाठी निघाले. मात्र ताडगावजवळचा नाला सुध्दा भरला होता. त्यामुळे ताडगाव येथेही पोहोचणे कठीण होते. रात्र जंगलातच काढण्याची आपत्ती निर्माण झाली होती. ही बाब ताडगाव येथील व्यापारी, नागरिक व पोलिसांना माहित झाल्यानंतर त्यांनी ताडगाव जवळचा नाला गाठला. नाल्याच्या दोन्ही बाजुला दोर बांधून पुलावरून पाणी असतानाही प्रवाशांना ताडगावकडे सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या जेवन व निवासाची व्यवस्था सुध्दा केली.

Web Title: Annual average exceeded by rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस