अजून ३६ हजार कुटुंब शौचालयापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:02 AM2018-12-12T00:02:41+5:302018-12-12T00:03:44+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटल्याने ते लोक शौचालयापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे ४५६ ग्रामपंचायती शासन दफ्तरी १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र तरीही तब्बल ३६ हजार १८७ कुटुंबांमध्ये अजूनही शौचालय नाही. यातील बहुतांश कुटुंब हे नव्याने अस्तित्वात आल्याने आणि काही पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटल्याने ते लोक शौचालयापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे. आता या सर्व पात्र कुटुंबांच्या घरी शौचालय उभारण्यासाठी आणखी ४३ कोटी ४२ लाखांचे अनुदान द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे.
२०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात एकूण १ लाख ८५ हजार १७४ कुटुंबे होती. त्यापैकी ७१ हजार ९१२ कुटुंबांमध्ये शौचालय होते, तर १ लाख १३ हजार २६२ कुटुंबे शौचालयापासून दूर होती. आता सहा वर्षात त्या सर्व कुटुंबांमध्ये शौचालयाची उभारणी करून जिल्हा हागणदारीमुक्त केल्याचा गवगवा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यावर्षीच्या उन्हाळ्यात केला. मात्र २०१२ च्या पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेली आणि नव्याने तयार झालेली ३७ हजार ३७ कुटुंबे अजूनही शौचालयापासून वंचित असल्याचे आता या विभागाच्या लक्षात आले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय अनुदानासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील ३६ हजार १८७ कुटुंबांकडून आता शौचालयासाठी आॅनलाईन प्रस्ताव भरणे सुरू करण्यात आले आहे. पंचायत समित्यांमार्फत त्यांची माहिती येत्या १५ डिसेंबरपर्यंत भरून पाठवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
२०१२ च्या सर्व्हेक्षणातून सुटलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ३७ हजार ३७ कुटुंबांपैकी केवळ ७८४ कुटुंबांकडे आजघडीला शौचालय आहेत. उर्वरित कुटुंबांपैकी केवळ ६६ कुटुंब वगळता इतर ३६ हजार १८७ कुटुंब शासनाच्या शौचालय अनुदानासाठी पात्र आहेत. त्यांना शौचालय बांधणी आणि वापरासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रतिकुटुंब १२ हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ४३ कोटी ४२ लाख रुपयांची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला, पण अद्याप शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
७२०८ लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षा
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निधीसाठी अनुदान मंजूर ठरूनही अद्याप जिल्ह्यातील ७२०८ कुटुंबे प्रत्यक्ष अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना ८ कोटी ६४ लाख ९६ हजार रुपये अनुदान देणे बाकी आहे. यात सर्वाधिक २७९८ लाभार्थी चामोर्शी तालुक्यातील आहेत. याशिवाय अहेरी तालुक्यातील १९९४ लाभार्थी, एटापल्ली तालुक्यातील १५४७, सिरोंचा तालुक्यातील ९२९, कोरची तालुक्यातील ६ तर गडचिरोली तालुक्यातील एका लाभार्थ्याचा समावेश आहे.