अहेरीत होऊ शकतो आणखी एक लोहप्रकल्प, कोनसरी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू : धर्मरावबाबा आत्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 04:03 PM2022-06-02T16:03:36+5:302022-06-02T16:09:46+5:30
कोनसरीत उभारल्या जात असलेल्या लोह प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते मार्च २०२३ पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले.
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्स या कंपन्यांकडून कोनसरी येथे उभारल्या जात असलेल्या प्रकल्पासोबत अहेरी क्षेत्रातही एक प्रकल्प उभारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू असल्याची माहिती आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडत आपली बाजू स्पष्ट केली.
सुरजागड लोहखाणीतून वर्षाला ३० मिलीयन टन लोहदगड काढण्याची परवानगी आहे. पूर्ण क्षमतेने लोहदगड काढल्यास कोनसरी, घुग्गूस आणि रायपूर येथील प्रकल्पांना लोहदगड पुरविल्यानंतरही शिल्लक राहू शकतो. त्यामुळे अहेरी येथे आणखी एक लोहप्रकल्प उभारावा, अशी मागणी आपण कंपनीकडे केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे धर्मरावबाबा म्हणाले. कोनसरीत उभारल्या जात असलेल्या लोह प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते मार्च २०२३ पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले.
या प्रकल्पात स्थानिक लोकांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. बेरोजगारांना केवळ १० टक्के रक्कम भरून १०० ट्रकचे मालक बनविले जाईल. त्यातून २०० लोकांना रोजगार मिळेल. सध्या पेसा क्षेत्रातल्या १३ गावांमधील ४०० च्या जवळपास लोक लोहखाणीत काम करत आहेत. ज्यांना आतापर्यंत तेंदूपत्त्याशिवाय दुसरा व्यवसाय मिळत नव्हता त्यांना बारमाही रोजगाराची सोय झाली आहे.
वीज समस्या दूर करण्यासाठी अहेरी, रेगुंठा, कमलापूर आणि पेरमिली येथे ३३ केव्हीचे ५ सबस्टेशन मंजूर झाले असून गट्टा स्टेशनचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर व इतर पदाधिकारी होते.
सुरजागडमधून शासनाला ४९ कोटींचा महसूल
सुरजागड लोहखाण पुन्हा सुरू होऊन जवळपास दीड वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याच्या खनिज विकास निधीत ४९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. या निधीतून निकषाप्रमाणे विविध विकासात्मक काम केले जातील, असे धर्मरावबाबा म्हणाले.
कमलापूर, पातानीलमधून केवळ दोनच हत्ती जाणार
कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये ८ तर, पातानील येथे ३ हत्ती आहेत. या हत्तींचे स्थानांतरण गुजरातमध्ये करण्याबाबतच्या हालचाली सुरू होत्या. पण, आता कमलापूर येथील एक वृद्ध हत्तीण आणि दोनपैकी एक नर अशा दोनच हत्तींना गुजरातमध्ये नेले जाणार असल्याचे धर्मरावबाबा म्हणाले. त्याबाबत वनविभागाकडे अजून स्पष्ट आदेश आलेले नाही. मात्र पूर्ण हत्ती नेऊन हत्ती कॅम्पचे अस्तित्व संपविले जाणार नाही.