पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या

By संजय तिपाले | Published: December 3, 2023 12:49 PM2023-12-03T12:49:24+5:302023-12-03T12:50:31+5:30

कोरची तालुक्यातील घटना: १८ दिवसांत चौघांना संपविले

Another youth was killed by Naxalites on suspicion of being a police informer | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या

गडचिरोली: जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा  उत्तर गडचिरोलीकडे  वळवला आहे. २ डिसेंबरच्या रात्री पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका तरुणाची गळा आवळून हत्या करत पत्रक सोडण्यात आले. मत तरुण एकेकाळी नक्षल्यांसाठीच काम करत होता हे विशेष.

सध्या नक्षलवाद्यांचा ‘पीएलजीए’ सप्ताह सुरु आहे. पहिल्या दिवशी भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रके टाकल्यानंतर मध्यरात्री नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील मुरकुटी येथील चमरा मडावी (३८) याची गळा आवळून हत्या करण्यात आली. तो पोलिस खबरी असल्याचा संशय नक्षल्यांनी मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.  चमरा हा पोलिस खबरी असून नक्षल्यांच्या नावावर त्याने अनेकांकडून पैसे गोळा केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, चमरा मडावी हा नक्षल्यांचा समर्थक होता.दारूगोळा पुरवठा करण्यासाठी त्याने नक्षल्यांकडून मोठी रक्कम घेतल्याने त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक तपासानंतर नेमके कारण समजेल असे त्यांनी सांगितले.

चमराची बहीण, मेहुणाही नक्षल चळवळीत
२०२१ साली चमरा मडावी यास नक्षल्यांना बंदुकीच्या गोळ्या पुरवठा करण्याचा तयारीत असताना छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची बहीण जहाल नक्षलवादी डीव्हीसी मानसिंग होळी याची पत्नी असून ती सुद्धा नक्षल्यांच्या ‘एमएमसी’ झोनमध्ये विस्तार प्लाटून ३ मध्ये कार्यरत आहे. 

असे घडले हत्यासत्र...
१५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे याची गोळ्या झाडून हत्या केली होती, २३ नोव्हेंबरला टिटोळा (ता.एटापल्ली) येथे पोलिस पाटील लालसू वेडदा यांना संपविण्यात आले.२४ नोव्हेंबरला कापेवंचा (ता.अहेरी)येथे रामजी आत्राम याची हत्या झाली तर २ डिसेंबरच्या रात्री चमरा मडावी (रा.मुरकुटी ता.कोरची) याचा नक्षल्यांनी गेम केला. चारही हत्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून झाल्या असून नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या घटनांनी जिल्हा हादरुन गेला आहे.

 

Web Title: Another youth was killed by Naxalites on suspicion of being a police informer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.