ट्रॅक्टरधारकांच्या उपोषणाची सांगता
By Admin | Published: August 9, 2015 01:32 AM2015-08-09T01:32:37+5:302015-08-09T01:32:37+5:30
शासनाने रेती उत्खनन व वाहतुकीसंदर्भात ट्रॅक्टरधारकांवर लावलेल्या जाचक अटी शिथील कराव्या, या मागणीला घेऊन अहेरी उपविभागातील सर्व ट्रॅक्टर मालक, चालक...
तीन दिवस उपोषण : नायब तहसीलदारांचा पुढाकार
अहेरी : शासनाने रेती उत्खनन व वाहतुकीसंदर्भात ट्रॅक्टरधारकांवर लावलेल्या जाचक अटी शिथील कराव्या, या मागणीला घेऊन अहेरी उपविभागातील सर्व ट्रॅक्टर मालक, चालक व मजुरांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. शनिवारी उपोषणाच्या चवथ्या दिवशी अहेरीचे नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष उपोषणकर्ते रवी नेलकुद्री यांना लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेच्या वतीने अहेरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण ५ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले होते. शासनाने गौण खनिज कायद्यामध्ये शिथीलता आणून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना खनिज उत्खनन व वाहतुकीचे परवाने जारी करावे, उद्योगविरहीत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना काम देऊन उपासमार थांबवावी, या ट्रॅक्टर चालक-मालकांच्या मागण्या होत्या.
उपोषणादरम्यान विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता. शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेनेचे अहेरी उपजिल्हा प्रमुख अनंत बेझलवार यांच्या मार्फत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे वारंवार चर्चा केली. त्यानंतर अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून अहेरीचे नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी ट्रॅक्टरधारकांच्या समस्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून येत्या दोन-तीन महिन्यात यावर शासनाकडून तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार सिलमवार यांनी दिले. याप्रसंगी ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रवी नेलकुद्री, उमेश गुप्ता, कपील गुंडावार, गणेश सल्लावार, आबीद शेख, प्रभाकर डोंगरे, संजय झाडे, राकेश वरदलवार, बब्बर शेख, विजय खरवडे, शंकर मगडीवार, श्रीनिवास चटारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)