अंत्योदयच्या लाभार्थ्यांना पाच महिन्यांपासून रेशनची साखर मिळालीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:38 PM2024-08-31T15:38:02+5:302024-08-31T15:39:24+5:30

एक लाख कुटुंबांना प्रतीक्षा : खुल्या बाजारातून खरेदी

Antyodaya beneficiaries have not received ration sugar for five months | अंत्योदयच्या लाभार्थ्यांना पाच महिन्यांपासून रेशनची साखर मिळालीच नाही

Antyodaya beneficiaries have not received ration sugar for five months

दिगांबर जवादे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
अंत्योदयच्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्रती कार्ड एक किलो साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र एप्रिल महिन्यापासून या लाभार्थ्यांना साखर मिळालीच नाही. त्यामुळे या गरीब लाभार्थ्यांना खासगी दुकानातून महागडी साखर खरेदी करावी लागत आहे. 


मागील काही वर्षांपासून केशरी रेशन कार्डधारकांना साखर देणे शासनाने बंद केले आहे. मात्र ज्यांचे कार्ड अंत्योदयचे आहे. त्यांना ३५ किलो धान्यासोबत प्रती कार्ड एक किलो साखर दिली जाते. पूर्वी प्रत्येक महिन्याच्या रेशन वितरणासोबत साखर उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे गहू व तांदळासोबत साखर मिळत होती. मात्र मागील दोन वर्षांपासून साखर वितरणात अनियमितता आली आहे. चार ते पाच महिने साखरच दिली जात नाही. त्यानंतर एकाचवेळी साखरेचे वितरण केले जाते. विशेष म्हणजे प्रतीकार्ड एकच किलो साखर दिली जाते. तिही नियमितपण दिली जात नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे.


सणासुदीत पुरवठा विभागामार्फत अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर उपलब्ध करून दिली जाते. अंत्योदय लाभार्थी हे गरीब व ग्रामीण भागातील राहत असल्याने ते फारशी तक्रार करत नाही. याचा गैरफायदा अधिकाऱ्यांकडून घेतला जाते. चांगल्या दर्जाची साखर पाठवावी, अशी मागणी या नागरिकांकडून होत आहे. 


काही दुकानदार परस्पर लावतात विल्हेवाट? 
अनेक महिन्यांपासून साखर मिळत नसल्याने ती कोणत्या महिन्यात 3 येईल हे लाभार्थ्याला माहीत राहत नाही. चार ते पाच महिन्यांची साखर एकाचवेळी पाठवली जाते. काही दुकानदार पॉस मशिनमध्ये साखर वितरणाची एन्ट्री करतात. मात्र लाभार्थ्यांला साखरच देत नाही. पावतीवर त्या साखरेची एन्ट्री असते मात्र लाभार्थी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. शिल्लक असलेली साखर दुकानदार खुल्या बाजारात विकतात.


काही दुकानदार पाच महिन्यांची साखर आल्यास तीनच महिन्याची साखर लाभार्थ्यांना देतात. उर्वरीत दोन महिन्यांची साखर हडप करतात. असे अनेक प्रकार साखरेच्या बाबतीत घडले आहेत. त्यामुळे साखरेचे नियमित वितरण होणे आवश्यक आहे. 


लाभार्थ्यांची अशी आहे तालुकानिहाय संख्या 
तालुका                             लाभार्थी

अहेरी                                 १२,४४४ 
आरमोरी                              ५,९२४ 
भामरागड                            ५,७९८ 
चामोर्शी                              १२,९६३ 
देसाईगंज                             ४,५६७ 
धानोरा                                ११,०७० 
एटापल्ली                             ९,७१० 
गडचिरोली।                          ९,११४ 
कोरची                                 ५,१०६ 
कुरखेडा                              ११,३४३ 
मुलचेरा                                ५,४०९ 
सिरोंचा                                 ८,००४ 
एकूण                                १,०१,४५२


२० रूपये किलो दर 

  • प्रत्येक लाभार्थ्याला गहू व तांदूळ मोफत उपलब्ध करून दिले जाते. मात्र अंत्योदयच्या लाभार्थ्यांकडून साखरेसाठी प्रतीकिलो २० रूपये आकारले जातात. बाजारात ही साखर ४४ रूपये किलो आहे. शासन विविध प्रकारच्या योजना राबवते. तर या लाभार्थ्यांना साखर मोफत उपलब्ध का करून दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
  • शासन नियमित साखर पाठवत नसल्याने साखरेचे वितरण शासन बंद करणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साखरेचे वितरण सुरू ठेवावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

Web Title: Antyodaya beneficiaries have not received ration sugar for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.