पावसाच्या हुलकावणीने चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:37+5:302021-09-10T04:44:37+5:30
यावर्षी गडचिराेली जिल्ह्यात सरासरी पावसाच्या केवळ ७५ टक्केच पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ६० टक्केच पाऊस झाला ...
यावर्षी गडचिराेली जिल्ह्यात सरासरी पावसाच्या केवळ ७५ टक्केच पाऊस झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तर केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडून पावसाची तूट भरून निघेल असा अंदाज शेतकऱ्यांचा हाेता. मात्र हा अंदाज खाेटा ठरत चालला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस कमी हाेऊन कडक ऊन पडण्यास सुरुवात हाेते. या कालावधीत धान पीक गर्भात राहते. अशा वेळी धानाला तलाव किंवा बाेडीचे पाणी दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र यावर्षी तलाव बाेड्या अर्ध्याच भरल्या आहेत. त्यातच आतापासूनच पाणी दिले जात आहे. त्यामुळे अर्धेच भरलेले जलसाठे कमी हाेण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी पुरामुळे पिकांचे नुकसान झाले हाेते. यावर्षी पाण्याअभावी धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे.
बाॅक्स
दुथडी भरून नदी वाहिलीच नाही
- यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही. वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द धरणाचे दरवाजे साेडले जातात. त्यावेळी या नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढते. मात्र जिल्ह्यातील इतर लहान नद्या एकदाही भरल्या नाहीत.
- धान पीक धाेक्यात असले तरी कापूस, साेयाबीन व इतर पिके मात्र जाेमात असल्याचे दिसून येते. या पिकांना कमी प्रमाणात पावसाची गरज भासते. तेवढेच पाणी यावर्षी पडत आहे. याचा फायदा या पिकांना झाला आहे.