दुधाळ जनावरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:48 PM2018-11-12T22:48:05+5:302018-11-12T22:48:23+5:30
नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाद्वारे पशुपालकांना दुधाळ जनावरे अनुदानावर वितरित केले जातात. यासाठी अर्ज करण्यासाठी १५ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाईन मागविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाद्वारे पशुपालकांना दुधाळ जनावरे अनुदानावर वितरित केले जातात. यासाठी अर्ज करण्यासाठी १५ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाईन मागविण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना दुधाळ जनावरे, शेतीगट, कुकुटपालनासाठी शेडसाठी अनुदान दिले जाते. सर्वसाधरण प्रवर्ग, विशेष घटक प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग या संवर्गनिहाय योजना राबविली जाते. यापूर्वी आॅफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात होते. यावर्षी मात्र अर्ज मागविण्याची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर घरबसल्या अर्ज भरता येणार आहे. प्राप्त झालेले अर्ज फक्त त्याच आर्थिक वर्षात ग्राह्य धरले जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया आॅनलाईन झाल्याने पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर पशुपालकांना घरबसल्या अर्ज भरता येणार असल्याने अर्ज भरण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. त्यामुळे यावर्षी या योजनेला चांगला प्रतिपाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठरलेल्या मुदतीत पशुपालकांनी अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.