अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:28 PM2019-04-14T22:28:28+5:302019-04-14T22:30:58+5:30
अतिरिक्त शिक्षकांच्या आक्षेपावर निर्णय देऊन समायोजन प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिरिक्त शिक्षकांच्या आक्षेपावर निर्णय देऊन समायोजन प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रमेश उचे उपस्थित होते. निवेदन देताना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्यवाह अजय लोंढे, शेमदेव चापले, यशवंत रायपुरे, मनोज निंबार्ते, किशोर पाचभाई, संजय दौरेवार, यादव बानबले, नत्थु टेकाम, रेखा लांजेवार तसेच इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार संस्थांनी आपल्याकडे दिलेल्या यादीनुसार खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांची नावे १५ मार्च २०१९ ला प्रसिध्द करण्यात आले. या यादीवर काही अन्यायग्रस्त शिक्षकांनी आक्षेप सुध्दा नोंदविले आहे. या आक्षेपावर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, सुनावणीनंतर नव्याने अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांना सुध्दा आक्षेपासाठी संधी द्यावी व त्यानंतर शिक्षक समायोजनाची प्रक्रिया पार पाडावी, असे म्हटले आहे. काही शिक्षणसंस्थांनी शासन निर्णयानुसार शिक्षकांना अतिरिक्त ठरविले नाही. त्यामुळे याबाबत अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या, असेही निवेदनात म्हटले आहे.