अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावा
By admin | Published: June 25, 2016 01:24 AM2016-06-25T01:24:43+5:302016-06-25T01:24:43+5:30
आमदार क्रिष्णा गजबे यांनी पंचायत समिती देसाईगंजच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेतला.
क्रिष्णा गजबे यांचे निर्देश : देसाईगंज तालुक्याचा घेतला आढावा
देसाईगंज : आमदार क्रिष्णा गजबे यांनी पंचायत समिती देसाईगंजच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेतला. या आढावा सभेदरम्यान अपूर्ण असलेली कामे तत्काळ मार्गी लावावी, कामाची गती वाढवावी, असे निर्देश आ. गजबे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, पंचायत समिती सभापती प्रीती शंभरकर, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नितीन राऊत, परसराम टिकले, शिवाजी राऊत, शांताबाई तितीरमारे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी यांच्यासह प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.
सिंचनाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियान व रोहयोच्या माध्यमातून बोडी दुरूस्ती, तलाव दुरूस्ती, बंधारे आदींची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र त्यातील निम्म्याहून अधिक कामे पावसाळा जवळ आला असतानाही पूर्ण झाली नाही. त्यामुळे या कामांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही चालू खरीप हंगामात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार नसल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर कामे तत्काळ मार्गी लावावी, अशा सूचना केल्या.
ग्रामपंचायत अंतर्गत अनेक नाल्यांचा उपसा करण्यात आला नसल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामीण भागात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करावा, असे निर्देश दिले.
काम करताना अधिकाऱ्यांना येणाऱ्या समस्याही आमदारांनी जाणून घेतल्या. त्यांच्या सोबत यावर चर्चा केली. गावातील समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असल्याने त्यांनी त्या समस्या सोडवाव्या. यासाठी शक्य झाल्यास स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी दिले. सभा यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.