सामाजिक शास्त्राच्या विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:46+5:302021-01-02T04:29:46+5:30
जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी. आष्टी : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत इयत्ता ६ वी व ...
जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.
आष्टी : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत इयत्ता ६ वी व ८ वीला सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्वच विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करून थकबाकी अदा करावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत २८ गणित/विज्ञान विषयाच्या शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आली. परतु सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जि.प.अंतर्गत सामाजिक शास्त्र विषयाचे इयत्ता ६ वी ते ८ वीला अध्यापन करणारे जिल्ह्यातील सर्वच विषय शिक्षक हे वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिले. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रक्रियेत सामाजिक शास्त्र विषयाचे विषय शिक्षक हे अध्यापनाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तेव्हा अन्यायग्रस्त व वेतनश्रेणीपासून वंचित सामाजिक शास्त्र विषयाच्या विषय शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार वेतनश्रेणीचा लाभ देऊन शिक्षकांना थकबाकी अदा करावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर आचेवार, सरचिटणीस कृष्णाजी मुंजुमकर, लचय्या गदेवार, उमेश चिलवेलवार उपस्थित होते. यासंदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.