विज्ञान विषय शिक्षकांना विनाअट पदवीधर वेतनश्रेणी लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:39+5:302021-01-01T04:24:39+5:30
गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीकरिता विज्ञान व गणित विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या ...
गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीकरिता विज्ञान व गणित विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार विज्ञान विषयाच्या विषय शिक्षकांचे पदे २०१६ पासून भरण्यात आले आहेत. या सर्व शिक्षकांना विनाअट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी विज्ञान पदवीधर शिक्षक असाेसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विज्ञान पदवीधर शिक्षक असोसिएशन चे राज्य संघटक तथा जिल्हा मार्गदर्शक संजय लोणारे, जिल्हाध्यक्ष मंगेश गद्देवार, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भुरसे, जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर मादेशी, शोनिश बिस्वास, अनिमेष बिस्वास, दिपक केंद्रे, जितेंद्र मुसेद्दीवार, प्रकाश देबनाथ, दीपक आत्राम, के. जी. बिस्वास, बी. एन. मल्लिक, सत्यजीत मंडल आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नाेकरीत रूजू झालेले शिक्षक बारावी विज्ञान व डी. एड् आणि कला, वाणिज्य विषयांत पदवीधर होते. त्यांना सेवेत असतांना विज्ञान विषयांत शासनाच्या निर्णयानुसारच पदवी संपादन करता येत नसल्याने त्यांनी कला व वाणिज्य विषयात पदवी संपादन केलेली होती. त्यानंतर २०१६ च्या परिपत्रकानुसार विषय शिक्षक पदावर नियुक्ती मिळाल्यापासून पाच वर्षाच्या आत पदवी पूर्ण करून देण्याची अट घातल्याने सर्व विषय शिक्षक पाच वर्षाच्या आत विज्ञान विषयात पदवी पूर्ण केलेली आहे. विषय शिक्षक नियुक्ती वेळीच कला किंवा वाणिज्य विषयात पदवीधर होते. पुन्हा नव्याने त्यांनी विज्ञान विषयात सर्वच विषय शिक्षक पदवीधर झालेले आहेत. परंतु शासन परिपत्रकानुसार एकूण पदाच्या ३३ टक्के शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. या अटीमुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांना वेतनश्रेणीपासून वंचित राहावे लागत आहे.
बाॅक्स ......
सेवा कनिष्ठ शिक्षकांना अधिक वेतन
सेवाकनिष्ठ शिक्षकांना सेवाज्येष्ठ शिक्षकांपेक्षा अधिक वेतन मिळत आहे. तसेच काही विषय शिक्षक सेवानिवृत्त झाले तरी त्यांना पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित राहावे लागणार आहे. ही बाब अन्याय कारक असल्याने, शासन परिपत्रकातील ३३ टक्के अट रद्द करून शासन स्तरावरुन सर्वच पदवीधर झालेल्या विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करून विज्ञान विषय शिक्षकांना न्याय देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.