मामा तलावांसाठी निधी मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:41 AM2021-09-22T04:41:09+5:302021-09-22T04:41:09+5:30
गडचिराेली : तालुक्यात ५० पेक्षा जास्त मामा तलाव आहेत. पण संवर्धनासाठी जि.प. कडून तुटपुुंजी तरतूद केली जाते. तलावांवर अतिक्रमण ...
गडचिराेली : तालुक्यात ५० पेक्षा जास्त मामा तलाव आहेत. पण संवर्धनासाठी जि.प. कडून तुटपुुंजी तरतूद केली जाते. तलावांवर अतिक्रमण केले. जि.प.ने निधीत वाढ करावी, अशी मागणी हाेत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी
आरमाेरी : करोडो रुपये खर्च करून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याने अल्पावधीतच रस्ता उखडत असल्याने शासनाला मोठा फटका बसत असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी, रस्त्याची दुरवस्था झाल्यास कंत्राटदाराला दोषी ठरवून त्याच्याकडून भरपाई घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
स्वच्छता मोहीम गतिमान करावी
अहेरी: शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक गावाच्या बाहेर कचऱ्याचे ढीग असल्याचे दिसून येते.
खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आळा घाला
गडचिराेली: शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक दहशतीत आहेत. अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बंदी घालणे गरजेचे आहे किंवा खाद्यपदार्थांची तपासणी नियमित करणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
घाेट : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीक विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नियमित लाइनमन नसल्याने त्रास
काेरची : जिल्ह्यातील बहुतांश गावांत लाइनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
नागरिकांना अद्यापही रस्त्यांची प्रतीक्षा
वैरागड : रस्त्यामुळे गावाचा विकास होतो. मात्र पक्के रस्तेच नसल्यास विकास खुंटतो. तालुक्यातील काही रस्ते पक्के नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.