कोरचीतील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:39 PM2018-10-14T23:39:45+5:302018-10-14T23:40:40+5:30
कोरची या तालुकास्थळावरील मुख्य तसेच शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. परिणामी रस्त्यांची रूंदी कमी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची या तालुकास्थळावरील मुख्य तसेच शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. परिणामी रस्त्यांची रूंदी कमी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन रस्ते मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोरची ग्रामपंचायत असताना १९९२ मध्ये कोरची तालुक्याची निर्मिती झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कोरची हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने वाहतुकीसाठी अरुंद असलेले रस्ते रूंदीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सूचना केल्या. रस्त्यांचे रुंदीकरण करावे असे आदेश सन १९९४ साली निर्गमित केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालय, तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचाली सुरू केल्या. रस्त्याच्या मध्यभागापासून साडेबारा मीटर जागा सोडावी, या जागेत बांधकाम असल्यास ते काढले जाईल, असे नोटीसमध्ये बजावले होते. तेव्हापासून रस्त्याच्या कडेला असलेल्या घरमालकांनी साडेबारा मीटर जागा सोडून घरांचे बांधकाम केले. मात्र काही नागरिकांनी प्रशासनाला न जुमानता साडेबारा फुटाच्या आत बांधकाम केले आहे.
कोरची ग्रामपंचायत असताना कोरची अंतर्गत असलेले सर्व रस्ते मनरेगाअंतर्गत रुंदीकरण करून ठेवलेले होते. मात्र आता अतिक्रमण वाढले आ हे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी ७१ लाख २४ हजार रुपये खर्च करून नालीचे बांधकाम केले जात आहे. रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्त्याच्या मध्यभागापासून केवळ पाच मीटर अंतरावर नालीचे बांधकाम सुरू आहे. अतिक्रमणधारकांना अभय देण्याचा प्रयत्न नगर पंचायतीकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.
कोरची शहराचा सिटी सर्वे करण्यात आला आहे. या सिटी सर्वेच्या आराखड्यानुसार रस्त्यांची रूंदी ठरवून नालीचे बांधकाम करणे आवश्यक आहे.