दुचाकीचा आरसा तोडल्याचा वाद, खुनाच्या प्रयत्नात तरुणास जन्मठेप
By संजय तिपाले | Published: July 4, 2024 09:16 PM2024-07-04T21:16:30+5:302024-07-04T21:17:12+5:30
मानापूर येथील घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश.
संजय तिपाले, गडचिरोली : पाहुण्याच्या दुचाकीचे दोन्ही आरसे तोडल्यावरुन झालेल्या वादानंतर एकाने काठीने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न केला. वर्षभरापूर्वी आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे घडलेल्या या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने ४ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. विकास कुलकर्णी यांनी हे आदेश दिले.
आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे २५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजता विजय भानुजी ढवळे (४८)हे गावातील एका पानटपरीसमोर बसलेले होते. यावेळी गावातील अमोल उध्दव साखरे (३४) याने काठीने डोक्यावर मारहाण केली. यात विजय हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी २६ एप्रिल २०२३ रोजी विजय यांचा पुतण्या चेतन प्रकाश ढवळे याच्या फिर्यादीवरुन अमोल साखरेविरुध्द आरमोरी ठाण्यात भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंद झाला होता.
दरम्यान, जखमी विजय हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून होते, गावातील नातेवाईकांनी त्यांना देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथून जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात असतांना जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना नंतर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात हलविले. दरम्यानख जखमी विजय ढवळे यांचा २० जून २०२३ रोजी जबाब नोंदविण्यात आला. त्यात त्यांनी घटनेच्या एक वर्षाआधी पुतण्या चेतन ढवळे याच्या घरी पाहुणे आले असता त्यांच्या दुचाकीचे दोन्ही आरसे अमोल साखरे याने तोडून नुकसान केले होते. तेव्हा अमोल साखरे सोबत वाद झाले होते. या कारणावरुन अमोल साखरे याने काठीने जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले होते.
तत्कालीन पो.नि. संदीप मंडलिक यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली विकास कुलकर्णी यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी सहाय्य केले.
दोन महिन्यानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर
विजय ढवळे यांच्या डोक्याला हल्ल्यात तीन गंभीर दुखापती झाल्या होत्या. दोन महिने ते कोमात होते. मृत्यूच्या दाढेतून ते सुदैवाने सुरक्षित बाहेर आले. वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे जबाब ग्राह्य धरुन तसेच जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नात जन्मठेपेची पहिलीच शिक्षा
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा मानला जातो. यात बहुतांश प्रकरणात दहा वर्षांपर्यंत शिक्षा व द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली जाते. मानापूर येथील प्रकरणात आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली. खुनाच्या प्रयत्नात जन्मठेपेची शिक्षा होण्याचे हे जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण असल्याचा दावा जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी केला.