आरमोरी, देसाईगंजात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:22 AM2018-09-27T01:22:24+5:302018-09-27T01:23:01+5:30
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात ३०० कर्मचारी गावागावात फिरून नवीन कुष्ठरुग्ण शोधत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/देसाईगंज : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात ३०० कर्मचारी गावागावात फिरून नवीन कुष्ठरुग्ण शोधत आहेत. शिवाय नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपाययोजना व करावयाची तपासणी आदीबाबतची माहिती देऊन जनजागृती केली जात आहे.
आरमोरी तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम २४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ९ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. आशा स्वयंसेविका व क्षेत्र कर्मचारी मिळून एकूण ११८ जणांची चमू या कामात लागली आहे.
कर्मचारी घरोघरी जाऊन कुष्ठरोगाची माहिती नागरिकांना देत आहे. कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपाय, शारीरिक तपासणी, सल्ला व मार्गदर्शन आदीबाबत जनजागृती केली जात आहे. कुष्ठरोग निर्मूलन अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी तर सचिव तालुका आरोग्य अधिकारी आहे. याशिवाय वैद्यकीय अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, कुष्ठरोग संघटना, आशा समन्वयक आदींचा समितीत समावेश आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत कुष्ठरोगाचे ओपीडी कार्ड देण्यात आले असून नजीकच्या काळात नागरिकांनी शरीरावर कुठलेही चट्टे आढळल्यास आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात दर शुक्रवारी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आनंद ठिकरे, कुष्ठरोग तंत्रज्ञ विनोद ठेंगरी, तालुका आरोग्य सहायक सुरेश दोनाडकर यांनी केले आहे. कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ.वाघधरे, डॉ.मडावी, डॉ.बन्सोड, डॉ.अवटे व आरोग्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागासाठी ८९ चमू कार्यरत असून यामध्े १७८ सदस्य सहभागी आहेत. आशा स्वयंसेविका, क्षेत्र कर्मचारी, पुरुष स्वयंसेवक हे अभियान कालावधीत रोज घरोघरी जाऊन कुष्ठरोगाची माहीती, लक्षणे, उपाय याबाबत शास्त्र शुध्द माहिती देत आहेत. गृहभेटीतून शारीरिक तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करून कुष्ठरोगाचे संशयीत रुग्ण शोधत आहेत.
अभियान काळात प्रत्येक गाव व शहरामध्ये कुष्ठरोग विषयी स्टिक्कर लावण्यात येत असून विविध माध्यमातून जनजागृती सुरू केलेली आहे. सेवा केंद्रातून तपासणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉ.ईकबाल शेख, कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर संदोकर यांनी केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिषेक कुंभरे, डॉ.अशोक गहाणे, डॉ.पी.जी. सडमेक, डॉ.यशश्री लीमजे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर सहकार्य करीत आहेत.