नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा
By admin | Published: June 5, 2017 12:39 AM2017-06-05T00:39:10+5:302017-06-05T00:39:10+5:30
नरभक्षक वाघाने आपले बस्तान आता देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील गावांमध्ये मांडले आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा,..
कोंढाळा ग्रामपंचायततर्फे निवेदन : खरीप हंगाम बुडण्याचा निर्माण झाला आहे धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : नरभक्षक वाघाने आपले बस्तान आता देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील गावांमध्ये मांडले आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत कोंढाळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आरमोरी व देसाईगंज तालुक्याच्या सीमेवरील रवी, अरसोडा, उसेगाव, कोंढाळा या गावांमध्ये दोन महिन्यांपासून वाघ आढळून येत आहे. कोंढाळा येथील लव्हा कुक्षी मेश्राम व रवी येथील मरप्पा या दोन शेतकऱ्यांवर नरभक्षक वाघाने हल्ला केला. पावसाळी शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतीमध्ये जाण्यास घाबरत आहेत. पावसाळ्यापर्यंत वाघ जंगलातच राहिल्यास शेतीचा हंगाम बुडण्याची शक्यता आहे. वाघाच्या दहशतीमुळे या परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत. सदर नरभक्षक वाघाला जेरबंद करणे आवश्यक आहे. नरभक्षक वाघासाठी पिंजरा मांडण्यात आला आहे. मात्र अजूनपर्यंत वाघ पिंजऱ्यात सापडला नाही. शार्प शुटरच्या मदतीने वाघ पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र वाघाने शार्प शुटरलाही हुलकावणी दिली. वन विभागाने कोणत्याही परिस्थिती वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी उपवनसंरक्षक होशींग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोशनी पारधी, कोंढाळाच्या सरपंच मंगला प्रकाश शेंडे, उपसरपंच गजानन राऊत, कैलाश राणे, पंढरी नखाते, गजानन सेलोटे, सुनिल पारधी यांच्यासह कोंढाळा तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक सुध्दा उपस्थित होते.