कर्मचारी महिलेच्या घरी धुडगूस घालणाऱ्या पत्रकारास अटक
By admin | Published: May 14, 2016 01:14 AM2016-05-14T01:14:04+5:302016-05-14T01:14:04+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयातील नरेगा कक्षात कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी
एटापल्ली : येथील पंचायत समिती कार्यालयातील नरेगा कक्षात कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी जबरदस्तीने प्रवेश करून धुडगूस घातल्या प्रकरणात एटापल्ली पोलिसांनी नागपूर येथील एका प्रादेशिक दैनिकाच्या एटापल्ली तालुका प्रतिनिधीला अटक केल्याची घटना शुक्रवारी घडली.
एटापल्ली येथील पं.स.मध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानात मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सर्व प्रथम दार ठोठावले. मात्र दार न उघडल्यामुळे या इसमाने बळजबरीने दार तोडून आत प्रवेश केला. आतील दाराची साखळी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. दार ठोठावण्याच्या आवाजाने जाग्या झालेल्या या महिला कर्मचाऱ्याने शौचालयाचा आधार घेतला. यानंतर मद्यधुंद अवस्थेत घरात शिरलेल्या या अज्ञात इसमाने धुमाकूळ घातला. त्यानंतर शौचालयाचाही दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर सदर भयभीत झालेल्या या कर्मचारी महिलेने सभोवतालच्या महिलांना घडलेल्या या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी येथे चौकशी करून मोबाईल व चप्पल जप्त केली.
त्यानंतर संबंधित कर्मचारी महिलेने या प्रकरणाची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात गती आणली. एसडीपीओंच्या निर्देशानंतर आरोपीला शोधण्याच्या कामात लागले . दरम्यान महिलेला त्रास देणाऱ्या संबंधित इसमावर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुशीला रच्चावार, रेणुका शेंडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुलभावार, पं.स. सभापती दीपक सोनटक्के, नगरसेविका सुनीता चांदेकर, नगरसेवक विजय नल्लावार, भाजपाचे पदाधिकारी बाबुराव गंप्पावार, अशोक पुल्लुरवार, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. ईश्वर डोके, अंचलेश्वर गादेवार यांच्यासह ४० ते ५० महिलांनी एटापल्ली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल इसमाचा आहे, त्याच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी लावून धरली. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून एटापल्ली पोलिसांनी अखेर जप्त केलेला मोबाईल असलेल्या विनोद चव्हाणवर गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. (तालुका प्रतिनिधी)