अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर सोडण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या धनीरामला अटक
By संजय तिपाले | Published: June 18, 2023 11:50 AM2023-06-18T11:50:24+5:302023-06-18T11:51:00+5:30
एसीबीची एटापल्लीत कारवाई: ३० हजारांची मागणी करुन स्वीकारले १५ हजार
संजय तिपाले, गडचिरोली: अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले दोन ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजर रुपयांची लाच मागणी करुन १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एटापल्ली येथे १७ जून रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. धनीराम अंताराम पोरेटी (३३) असे त्या वनरक्षकाचे नाव आहे.
धनीराम पारेटी हा एटापल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहे. तक्रारदाराचे एटापल्लीत दोन ट्रॅक्टर आहेत. त्याद्वारे नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना १७ जून रोजी वनरक्षक धनीराम पोरेटी याने दोन्ही ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडले. कारवाई न करता सोडून देण्यासाठी दोन ट्रॅक्टरचे प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पो.नि.श्रीधर भोसले, हवालदार नथ्थू धोटे, अंमलदार राजेश पदमगीरवार, स्वप्नील बांबोळे, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण यांनी ही कारवाई केली.
लाच स्वीकारताच झडप मारुन पकडले
लाचमागणी पडताळणीत ३० हजारांची मागणी करुन १५ हजार रुपये स्वीकारण्याचे वनरक्षक धनीराम पोरेटीने मान्य केले. त्यानंतर १७ जून रोजी एटापल्लीतील तक्रारदाराच्या सेतू केंद्रात तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झडप मारुन त्यास रंगेहाथ पकडले.