स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
By admin | Published: June 4, 2016 01:23 AM2016-06-04T01:23:03+5:302016-06-04T01:23:03+5:30
आरमोरी तालुक्यातील वघाळा येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात. यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मागील महिन्यांपासून सुरू झालेले आहे.
वघाळात घरटे बांधण्यास सुरूवात : यंदा पक्ष्यांच्या संख्येत ८ ते १० हजारांनी होणार वाढ
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वघाळा येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात. यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मागील महिन्यांपासून सुरू झालेले आहे. वघाळा येथील चिंचेच्या वृक्षांवर पक्ष्यांनी घरटे बांधून राहण्यासह सुरूवात केली आहे. त्यामुळे यंदा जवळपास ८ ते १० हजाराच्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
स्थलांतरित पक्षी वघाळा परिसरातील काडीकचरा तसेच नदीतील विविध वनस्पती, काट्या आणून घरटे तयार करीत आहेत. या महिन्यात पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असल्याने घरट्यात जुलैच्या पंधरवड्यापर्यंत नवीन पिलांचा जन्म होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ८ ते १० हजाराच्या संख्येने पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
वघाळा हे गाव नदीतिरावर वसलेले असल्याने चिंचेचे झाड मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय लगत नदी असल्याने पाण्यासह खाद्याचीही व्यवस्था होत असते. त्यामुळे वघाळा येथील दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा ओढा वाढत आहे. पक्ष्यांच्या आगमनामुळे गावात नेहमीच किलबिलाट असते. त्यामुळे गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या गावाला अनेक पक्षीमित्र व अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. वन विभागाच्या वतीने ई- टेंडर कंत्राटी पद्धतीने घेऊन येथील चिंचेच्या झाडांना ओट्याचे बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे झाडांची वयोमर्यादा वाढणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ वृक्ष जिवंत राहू शकतो. गावात पक्षी दाखल झाल्याने अनेकजण गावाला भेटी देत आहेत. (वार्ताहर)
ग्रामस्थांमार्फत पार्कची निर्मिती
स्थलांतरित पक्ष्यांचे थवे व घरटी पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी वघाळा येथे भेटी देतात. त्यामुळे पक्षी प्र्रेमींची संख्या लक्षात घेऊन त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने ग्रामस्थांच्या पुढाकाराने छोटासा पार्क तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गावाला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वघाळा गावातील स्थलांतरित पक्ष्यांची संख्या लक्षात घेता नव्याने निधी देऊन गावात विकासकामे करावीत, अशी मागणी वन्यजीव (पक्षी) संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, सुधाकर अनोले, धनराज दोनाडकर, संदीप प्रधान व ग्रामस्थांनी केली आहे. पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी वघाळावासीय पुढे सरसावले आहेत.