वघाळात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:34 AM2018-05-07T00:34:48+5:302018-05-07T00:34:55+5:30
जिल्ह्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पाहुण्या पक्ष्यांचे स्वागत, संवर्धन व संरक्षणासाठी वघाळावासीय सज्ज झाले आहेत. तसेच वन्यजीव पक्षी संरक्षण समिती तत्पर झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : जिल्ह्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पाहुण्या पक्ष्यांचे स्वागत, संवर्धन व संरक्षणासाठी वघाळावासीय सज्ज झाले आहेत. तसेच वन्यजीव पक्षी संरक्षण समिती तत्पर झाली आहे.
वघाळा (जुना) येथे एप्रिल ते मे महिन्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. ते नोव्हेंबर महिन्यात निघून जातात. जवळपास सहा महिन्यांचा मुक्काम याच गावात असतो. वघाळा येथे पक्ष्यांना आवडणारे वातावरण, नदीमध्ये मिळणारे खाद्य, पाणी, नैैसर्गिक सौंदर्य तसेच वघाळावासीयांकडून प्रेम व संरक्षण यामुळे येथील वातावरण स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे. विदर्भात सर्वात जास्त स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने वघाळा जुना येथे येतात. त्यामुळे पक्षी अभ्यासक, नागरिक, वन्यजीवप्रेमी वघाळा येथे भेट देतात. दरवर्षी पक्षी पाहणाऱ्यांची संख्या वाढतच असते.
वघाळा गावाला निधीचा पुरवठा करून गावातील विकासात्मक कामे, गावाला संरक्षक भिंत, वनउद्यानातील रखडलेली कामे, चिल्ड्रन पार्क, वॉच टावर यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच गावात घरकूल सारख्या योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने वघाळा (जुना) येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, जेणेकरून पर्यटकांची संख्या वाढेल असे स्थानिक नागरीकांची मागणी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी संवर्धन व संरक्षणाची परंपरा वघाळा गावाने जपूनही शासनाने पक्षी पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे वघाळा गावाला पक्षी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी वन्यजीव पक्षी संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, धनराज दोनाडकर, कार्तिक मेश्राम, रामकृष्ण धोटे, मंदा हरिहर खरकाटे व ग्रामस्थांनी केली आहे.
या पक्ष्यांचे वास्तव्य
ंवघाळा हे गाव ५६३ लोकसंख्या असलेले गाव असून गावात ४७ चिंचेची झाडे आहेत. याच चिंचेच्या महाकाय वृक्षावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी वास्तव्य करतात. करकोचा, ब्लॅक कारमोरन्ट, व्हाईट आयबीस, ओपन बिल स्कॉर्क, पेंटेड स्कॉर्क, कॅटल ई ग्रेट, लिटील कॉर्माेस्ट, चेस्टनस्ट ब्रिटन अशा अनेक जातीच्या पक्ष्याचे आगमन झालेले आहे.