वैरागड खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली
By admin | Published: January 3, 2016 02:03 AM2016-01-03T02:03:13+5:302016-01-03T02:03:13+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वैरागड येथे २५ डिसेंबर २०१५ पासून धान खरेदी केंद्र सुरू केले.
परवानेधारक व्यापारी : शेतकरी वर्ग समाधानी
वैरागड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वैरागड येथे २५ डिसेंबर २०१५ पासून धान खरेदी केंद्र सुरू केले. धानाचे चुरणे सुरू झाले असल्याने धान खरेदी केंद्रावर मागील आठवडाभरापासून धानाची आवक वाढली आहे.
वैरागड येथे बाजार समितीच्या परिसराबाहेर व्यापाऱ्याला धान खरेदी करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर वैरागड येथे धानखरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन परवानाधारक व्यापाऱ्यांना वैरागड येथे धान खरेदी सुरू करण्यास परवानगी दिली. वैरागड येथील धान खरेदी केंद्रावर मोहझरी, सुकाळा, कराडी, सावलखेडा, लोहारा, कोसरी व परिसरातील शेतकरी धान आणत आहेत. चांगल्या प्रतीच्या श्रीराम धानाला १ हजार ९५० रूपये व मध्य प्रतीच्या धानाला १ हजार ५०० रूपये भाव दिला जात आहे व इतर ठोकळ धानाला १ हजार २५० रूपये प्रती क्विंटल भाव दिला जात आहे. वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे. जास्तीत जास्त व्यापारी धान खरेदीसाठी यावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रोत्साहन दिले जात आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. (वार्ताहर)