अबब... दारुविक्रेत्याच्या घरातून तब्बल २१ लाखांची राेकड जप्त

By दिलीप दहेलकर | Published: September 4, 2024 07:52 PM2024-09-04T19:52:17+5:302024-09-04T19:52:55+5:30

आरोपी फरार : एवढी माेठी रक्कम जप्त केल्याची पहिलीच कारवाई

as much as 21 lakh cash was seized from the liquor seller house | अबब... दारुविक्रेत्याच्या घरातून तब्बल २१ लाखांची राेकड जप्त

अबब... दारुविक्रेत्याच्या घरातून तब्बल २१ लाखांची राेकड जप्त

दिलीप दहेलकर, गडचिरोली : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील स्वप्नील उर्फ शुभम शेंडे नामक दारू विक्रेत्याच्या घरात दारू लपवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली असता, हजारो रुपयांची देशी दारू तसेच सुमारे २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोकड आढळून आली. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिस संपूर्ण रक्कम व दारु असा एकूण २१ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केली. मात्र दारू विक्रेता स्वप्नील शेंडे हा फरार झाला. गडचिराेली पाेलिसांनी ही कारवाई तान्हा पाेळयाच्या दिवशी मंगळवारला केली. सदर कारवाई पाेलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक आरती सासवडे, पोलिस हवालदार पोल्लेलवार, स्वप्नील कुडावले, महिला पोलिस कर्मचारी वाचामी, बडे, मेश्राम, भुसारी आदींनी केली.

लाखाेंची रक्कम आली कुठून?

स्वप्नील शेंडे याच्या घरात दारूसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. मात्र घराच्या दरवाजाला कुलूप होते. दरम्यान, घरासमोर बसलेल्या यशोदा शेंडे नामक महिलेची चौकशी केली असता तिने घर आपल्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तपासादरम्यान पोलिसांना २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोख रक्कम सापडली. या रकमेत ५००, २००, १००,५० आणि २० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दारू विक्रेत्याच्या घरात एवढी मोठी रक्कम आली कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.

आरोपीच्या शोधात पोलिस

स्वप्नील शेंडे याच्या घरावर केलेल्या कारवाईदरम्यान स्वप्नील घराबाहेर होता. घरातून लाखाे रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळताच स्वप्नील फरार झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: as much as 21 lakh cash was seized from the liquor seller house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.