नवीन धानाची आवक वाढताच व्यापाऱ्यांनी कमी केले भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:18 PM2024-11-11T15:18:45+5:302024-11-11T15:32:01+5:30
यावर्षी पिकाचा दर्जा उत्तम : गरीब शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : या वर्षात समाधानकारक पाऊस, अपवाद वगळता धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याने धान पीक जोमात आहे. कमी मुदतीच्या धानाची कापणी, मळणी पूर्ण झाली आहे. हमीभाव केंद्र सुरू होण्यास वेळ असल्याने व खुल्या बाजारात धानाला चांगला भाव असल्याने धानाची आवक वाढली आहे. यंदा शासनाच्या हमीभाव केंद्रावर धानाची रेकॉर्ड ब्रेक खरेदी होण्याचा अंदाज आहे.
सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत नऊ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात ती पुन्हा लाखात वाढण्याची शक्यता आहे. या वर्षात १२ ते १३ लाख क्विंटल धानाची खरेदी होण्याचा अंदाज आहे. कमी मुदतीच्या धनाची कापणी, मळणी झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी दिवाळीपासूनच खुल्या बाजारात गर्दी केली आहे. बारीक धानाला केवळ २ हजार ४०० व ठोकळ धानाला २ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा सुरुवातीलाच भाव मिळत आहे. हमीभाव केंद्रावर २ हजार ३१० रुपये प्रति क्विंटल भाव व हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस असल्याने अनेक शेतकरी आता हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरूवात केली आहे.
भाव वाढीची प्रतीक्षा
मागील वर्षी नवीन धानाला तीन हजार रूपये भाव मिळाला होता. तेवढाच भाव यावर्षीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता भावासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी. विक्री कमी झाल्यास धानाचे भाव आपोआप वाढतील. तोपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
"या वर्षात दिवाळी सणापासून धान्याची आवक वाढली असून मागच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात जेवढा धान विक्रीसाठी आला होता तेवढा नोव्हेंबर महिन्याच्या आठ दिवसांत विक्रीला आला आहे. यावर्षी धनाचा पोतही चांगला आहे."
- गिरीश बोधनकार, धान्य व्यापारी, वैरागड
"या वर्षात अतिशय समाधानकारक पर्जन्य आणि धान पिकास अनुकूल वातावरण यामुळे धान पिकाच्या उत्पादनातही कमालीची वाढ झाली आहे. हे खुल्या बाजारात विक्रीला येणाऱ्या धानाच्या अंदाजावरून लक्षात येत आहे."
- दत्तू सोमनकर, धान्य व्यापारी, वैरागड.
"आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही पूर्ण झाल्या असून, नियोजनाची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने व या कार्यात अधिकारी व्यस्त आहेत. सध्या धान विक्रीसाठी ऑनलाइन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे."
- एच. एस. सोनवाने, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी