आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार?
By दिलीप दहेलकर | Published: August 13, 2023 07:55 PM2023-08-13T19:55:36+5:302023-08-13T19:56:07+5:30
सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रामध्ये भरत आहेत.या वेळापत्रकाची अंमलबजावणी १० जुलै २०२३ पासून सुरू झाली असून नव्या वेळापत्रकाचे परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या आश्रमशाळेत सुमारे दोनशे ते चारशेच्या आसपास आदिवासी विद्यार्थी शिकत असतात. आश्रमशाळेतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोय व समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तणाव निर्माण करणाऱ्या या वेळापत्रकामुळे विद्यार्थी व कर्मचारी त्रासल्याचे दिसून येते. हे वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे असून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. सकाळ सत्रातील पाचव्या तासिकेला विद्यार्थ्यांचे मन लागत नाही.
इयत्ता पहिली ते सातव्या वर्गातील विद्यार्थी भुकेने व्याकुळलेले असतात. मोठे विद्यार्थी कसेबसे तग धरून राहतात पण त्यांचेही वर्गात पाहीजे तसे मन लागत नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. जेवणानंतर लगेच सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्रात मात्र काही विद्यार्थी अक्षरशः डुलक्या मारतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेल्या अवस्थेमध्ये वर्गात बसतात, ही वस्तुस्थिती आहे. नव्या वेळापत्रकाला आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून या पाठोपाठ आता विद्यार्थी व पालकांचाही विरोध होत असल्याचे दिसत आहे.
आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना या वेळापत्रकाला विरोध करीत आहे. सदर वेळापत्रक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांवर लादल्या गेल्याची भावना आश्रमशाळेतील कर्मचारी,विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झालेली आहे. पूर्वीचेच वेळापत्रक ठेवण्याबाबत मुख्यमंत्री ,आदिवासी विकास मंत्री यांना संघटनेने निवेदन दिलेले आहे. परंतु अजूनपर्यंत वेळापत्रक बदललेले नाही.
असे आहे आश्रमशाळेचे वेळापत्रक
नव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५.३० वाजता उठावे लागते तर रात्री ९.३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८.४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२.३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १.३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४.०० वाजता तासिका संपल्यानंतरही हा सत्र सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असतो. सकाळचे जेवण दुपारी १२.३० वाजता तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६.३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नाश्ता असतो. शनिवारला शालेय सत्रास सकाळी ७.४५ वाजता सुरुवात होऊन ११.५० ला सुट्टी होते. शनिवारला दुपारी ३.०० ते ४.३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.
२३ ऑगस्टला आश्रमशाळा शिक्षकांचा एल्गार
या अन्यायकारक वेळापत्रकाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी आता आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड, राज्य कार्याध्यक्ष एस.जे.शेवाळे, राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी. भामरे,नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, ठाणे विभागीय अध्यक्ष राजेश पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ.अशोक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांच्या नेतृत्वात आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे २३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.