क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा

By दिलीप दहेलकर | Published: September 17, 2023 08:54 PM2023-09-17T20:54:40+5:302023-09-17T20:55:16+5:30

प्रशासनाची उडाली तारांबळ : नागपूर विभागात केवळ ०.०१ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली

Ashram school teachers boycott the aptitude test, only 21 took the test | क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा

क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा

googlenewsNext

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयुक्त स्तरावरून राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा राज्यभरात रविवार,१७ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेवर जवळपास शंभर टक्के शिक्षकांनी एकजुटीने बहिष्कार घातल्याने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील परीक्षा केंद्रावर प्रशासनाची तारांबळ उडाली. आणलेले प्रश्नपत्रिकेचे गट्टे परत घेऊन जाण्याची नामुष्की परीक्षा व्यवस्थापन अधिकाऱ्यांवर आली. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. यापुढे शिक्षकांची मानहानी करण्याचे आदिवासी विकास विभागाने थांबवावे, असे आवाहन आदिवासी विकास शिक्षक व कर्मचारी संघटनेने केले आहे. नागपूर विभागात केवळ ०.०१ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याने परीक्षा केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक व परीक्षा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना शेवटी हताश व्हावे लागले. आदिवासी विकास विभाग आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे ,अमरावती व नागपूर हे चार विभाग आहेत. याअंतर्गत राज्यात ५९६ शासकीय तर ५५६ अनुदानित अशा एकूण १ हजार १५२ शाळा आहेत. क्षमता परीक्षेवर १० हजारावर शिक्षकांनी बहिष्कार घातला. शिकवत नसलेल्या विषयाची एकत्रित प्रश्नपत्रिका परीक्षा घेऊन या शाळेतील शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण व बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याच्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी या परीक्षेला विरोध केला.

वेळोवेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये त्या त्या विषयाची परीक्षा होत असताना वेगळी परीक्षा घेण्याची गरज का? असा प्रश्न शिक्षकांनी केला. या क्षमता परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांनी केले होते. संघटनेचे राज्य पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, प्रकल्प अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी आपली शक्ती एकटावून आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांना बहिष्कार घालण्यास प्रोत्साहित केले. बहिष्कार आंदोलनास सीटू संघटना, अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना, आश्रम शाळा मुख्याध्यापक संघ, संस्कृती संघटना आदी संघटनेने पाठिंबा दिला होता.

प्रकल्पनिहाय परीक्षार्थीं उपस्थिती 

गडचिरोली - ००
चंद्रपुर - ००
वर्धा - ००
नागपूर - ०२ (अनुदानित)
चिमूर - ०६ (अनुदानित नवनियूक्त)
देवरी - ०१ ( शासकीय) 
भंडारा - ००
अहेरी - १० (तासिका) 
भामरागड - ०२ (तासिका) 
एकुण - २१ 

शासकीय आश्रमशाळा शिक्षकांची पुर्णता पाठ
शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा १७ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० ते ३.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेवर शिक्षकांनी एकजुटीने बहिष्कार घातल्याचे गडचिराेली येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेच्या परीक्षा केंद्रावर दिसून आले. या केद्रावर एकाही शिक्षकांनी परीक्षा दिली नाही, हे विशेष. नागपूर विभागात परीक्षा दिलेल्या २१ शिक्षकांमध्ये अनुदानित व तासिका तत्वावरील शिक्षकांचा समावेश आहे. नागपूर विभागात ९९.९९ शिक्षक बहिष्कारामध्ये सहभागी झाले. ०.०१ टक्के शिक्षक क्षमता चाचणीस उपस्थित हाेते.
 

Web Title: Ashram school teachers boycott the aptitude test, only 21 took the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.