आश्रमशाळा-वसतिगृहातील विद्यार्थी असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:36 AM2017-08-05T00:36:32+5:302017-08-05T00:37:48+5:30
विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग नाही * सर्पदंशासारख्या घटनांची पुनरावृत्ती शक्य * अहेरीत शासकीय वसतिगृह भाड्याच्या घरात
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी शासनाने ठिकठिकाणी शासकीय आणि खासगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांची सोय केली आहे. परंतु काही मोजक्या शासकीय आश्रमशाळांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी विद्यार्थी असुरक्षित वातावरणातच दिवस काढावे लागत असल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. ज्या सुविधा केवळ कागदोपत्री दाखविण्यात आल्या आहेत त्या प्रत्यक्षात तिथेच नसल्याचे लोकमतच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासींच्या विकासाच्या नावावर हडपल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन दिवसांपूर्वी चामोर्शी तालुक्यातल्या वायगावच्या अनुदानित वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून हे वसतिगृह चालविले जाते. त्या ठिकाणी असलेल्या सुविधांच्या अभावामुळे दोन विद्यार्थ्याना नाहक जीव गमवावा लागला. पण ही परिस्थिती केवल एक-दोन वसतिगृहांचीच नाही तर अनेक ठिकाणची आहे. अनेक वर्षांपूर्वी वसतिगृह इमारतींमधील सुविधांची थातूरमातूर तपासणी करून खिरापतीसारखे अनुदान वाटण्यात आले. पण आजतागायत त्या ठिकाणच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
प्राथमिक शाळेच्या मुलांना अद्याप ड्रेसही मिळाला नाही. मुलांचे ड्रेस घेऊन ठेवलेले आहे, पण ते खराब करतात म्हणून दिले आहेत. एक ड्रेस १५ आॅगस्टला तर दुसरा ड्रेस २६ जानेवारीला दिला जाईल असे उपस्थित कर्मचाºयांनी सांगितले.
जेवण एकीकडे, झोपणे दुसरीकडे
१०० विद्यार्थ्यांसाठी तीन वसतिगृह : ३१ वर्षांपासून भाड्याच्या घरात
अहेरी : येथे १९८६ साली सुरू करण्यात आलेले शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह ३१ वर्षांपासून भाड्याच्या खासगी इमारतीत चालत आहे. विविध शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची येथे राहण्याची व जेवणाची सोय केली जाते. मात्र त्यांना एका इमारतीत जेवण करावे लागते तर दुसºया इमारतीत झोपायला जावे लागते. येथे लोकप्रतिनिधी म्हणून आदिवासी समाजाच्या व्यक्तीनेच खासदार, आमदार, आदिवासी खात्याचे मंत्रीपद भूषविले असलेले तरी अजूनपर्यंत वसतिगृहात येणाºया विद्यार्थ्यांना आपल्या हक्काची इमारत नाही.
अहेरी हे तालुकास्थळी तीन दशकांपूर्वी अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व काही प्रमाणात मूलचेरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी एकमेव पर्याय होता. त्यामुळे लगतच्या सर्वच तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी अहेरीतच शिक्षणासाठी येत आणि आजही येतात. पण त्यांना मागील तीन दशकांपासून वसतिगृह म्हणून एक खासगी इमारत मिळत आहे. तिथे त्यांना स्वत:ला अॅडजस्ट करत राहावं लागत आहे. अवघ्या १०० विद्यार्थ्यांसाठी जवळपासच्या तीन इमारती आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत किरायाने घेण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये २५, २५ व ५० असे विद्यार्थी विभागून राहतात. त्यातील एका इमारतीत जेवणाची सोय करण्यात आली आहे तर एका इमारतीत वसतिगृहाचे कार्यालय आहे. तिन्ही इमारतीला शासनामार्फत १६ हजारच्या वर महिन्याचे भाडे मोजावे लागते.
अंदाजपत्रकाचे भिजत घोंगडे
याबाबतची दखल घेऊन २०११ मध्ये शासनातर्फे वसतिगृहासाठी खमनचेरू मार्गावरील सर्व्हे नं.२२ क्षेत्र ०.७५ हे आर जागा मिळाली. किमान १५० विद्यार्थ्यांची मर्यादा असलेले वसतीगृह तयार करण्याचे अंदाजपत्रक २०१३ ला तयार करण्यात आले. त्यासाठी ३३७.४६ लक्ष अंदाजित रक्कम लागणार होती. परंतु त्रुटीमुळे ती मंजूर झाली नाही. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०१५ ला सुधारित ८५५.२३ लक्ष रुपयांचे नवीन अंदाजपत्रक सादर करण्यात आले व ते शासन दरबारी ठेवण्यात सुद्धा आले, पण त्यावर अजूनपर्यंत कार्यवाही झालेली नाही.
१०० विद्यार्थी क्षमता असलेल्या या वसतिगृहात शाळा महाविद्यालये सुरू होऊन महिना होत असला तरी फक्त ३० विद्यार्थी उपस्थित झाले आहेत. आठवी ते उच्च शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांमधून बहुतेक आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहात आगमन झाले आहे. उर्वरित ७० विद्यार्थी अद्यापही आलेले नाहीत.
२०११ मध्ये वसतिगृहासाठी जमीन प्राप्त झाली. त्यानंतर अंदाजपत्रक पाठवण्यात आले, परंतु त्यात त्रुटी आढळल्या. नंतर सुधारित अंदाजपत्रक पाठवले आहे. आॅनलाईन प्रवेश प्रक्रि या व वेबसाईटच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश कमी झाला असला तरी या आठवड्यात प्रवेश पूर्ण होऊन जाईल.
- प्रवीण लाटकर, प्रभारी प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी
मुख्याध्यापकासह शिक्षकांचे अपडाऊन
‘लोकमत’ने या शाळेला भेट दिली असता शाळेचे मुख्याध्यापक गडचिरोलीला बैठकीसाठी गेले होते. मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक हजर होते तर मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षक गावातील आपल्या खोलीवर गेल्या होत्या. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि अधीक्षक तिथे राहतात. मुख्याध्यापक फर्लांगभर अंतरावर गाव असल्यामुळे घरूनच अप-डाऊन करतात. मात्र इतर १० शिक्षकवृंदांपैकी कोणीही शाळा सुटल्यानंतर तिथे राहात नसल्याचे मुलांनी सांगितले.
जि.प.च्या ६० वसतिगृहांची तपासणी कराच
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ६० वसतिगृह चालविली जातात. यापैकी बहुतांश वसतिगृहातील विद्यार्थी जमिनीवरच झोपतात. अनेक इमारतीच्या परिसराला वॉल कंपाऊंडसुद्धा नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसात सापासारख्या सरपटणाºया प्राण्यांपासून जीवास धोका असतो. परंतू इतक्या वर्षात त्या ठिकाणी पुरेपूर सुविधा देण्याची तळमळ कोणत्याही लोकप्रतिनिधीने दाखविलेली नाही. याऊलट असुविधा आहेत म्हणून कारवाई करण्यासाठी पुढे आलेल्या अधिकाºयांवर राजकीय दबाव टाकून कारवाई रोखली आहे. समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांना याबाबत विचारले असता शासन केवळ मुलांच्या जेवणाचे पैसे देते. सुविधा देणे संबंधित संस्थेचे काम असल्याचे ते म्हणाले.
कर्मचाºयांवर ठरतो जेवणाचा मेनू
लोकमतने शाळेच्या स्वयंपाकगृहात पाहणी केली असता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती. कोबीची भाजी, डाळ आणि भात असा मेनू केला जात होता. पोळ्या बनवणार नाही का? असे विचारले असता कामाठी महिलेने ‘नाही’ असे उत्तर देत त्यामागील कारण स्पष्ट केले. स्वयंपाकघरातील ९ कर्मचाºयांपैकी (स्वयंपाकी-कामाठी) २ कर्मचारी बिमार मुलांना दवाखान्यात घेऊन गेले आहेत. ४ सुटीवर आहेत. त्यामुळे केवळ ३ जण हजर आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांसाठी पोळ्या करणे शक्य नसल्यामुळे भातच दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोंडीव खोल्यात मुलींच्या झोपण्याची सोय
गडचिरोलीपासून २२ किलोमीटर अंतरावरच्या गिरोली येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत वर्ग १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ४१९ आहे. पण एवढ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय तेथील वसतिगृहात दिसली नाही. पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी २ छोटे हॉल आणि २ खोल्या आहेत. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी एक हॉल आणि २ छोट्या रुम आहेत. पाचवी ते दहावीच्या मुलींची व्यवस्था तळमजल्यावरच्या ४ कोंडीव खोल्यांमध्ये आहे. त्याच खोल्यांमध्ये त्यांना कपडे वाळायला टाकावे लागतात. या मुली जमिनीवर कशाबशा दाटीवाटीने झोपत असल्याचे मुलींनी सांगितले. या शाळेला एका बाजूने कंपाऊंड वॉलच नाही. त्याच दिशेने पुढे गावतलाव आहे. त्यामुळे तिकडून साप-विंचू येऊन या मुलींच्या खोल्यांमध्ये आरामात प्रवेश करू शकतो.